दिल्ली डायरी – दिल्लीचे नेमके काय होईल?

>> नीलेश कुलकर्णी, [email protected]

अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा व वीजपुरवठा या क्षेत्रांत उत्तम काम केले आहे. त्यामुळे केजरीवालांचा जनाधार आजही टिकून आहे. त्यामुळे आता राज्याचा दर्जा संपवून दिल्लीला ‘मेट्रोपोलिटन कौन्सिल’ बनवायचे आणि केजरीवालांची सद्दी संपवायची असा एक कुटिल डाव सध्या भाजपच्या चाणक्यांच्या डोक्यात घोळतो आहे. या कल्पनेला भाजपमधल्या काही सुज्ञांनी विरोध केला आहे, मात्र राजधानी दिल्लीचे नेमके काय होईल, अशी भीती आता समस्त दिल्लीकरांना वाटायला लागली आहे.

राजधानी दिल्ली ही देशवासीयांची ‘आन, बान आणि शान’ आहे. मात्र या ‘दिल्लीचे नेमके काय होईल?’, असा प्रश्न सध्या दिल्लीकरांना पडला आहे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे दिल्लीवासीयांना पायाभूत सुविधांसाठी सध्या करावी लागत असलेली पळापळ! दिल्लीत एकीकडे पावसाचे पाणी तुंबून नवीन संसदेच्या इमारतीमध्ये घुसत आहे, तर दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठी सामान्य दिल्लीकर त्राही भगवान आहेत. विजेचा पुरवठाही वारंवार खंडित होत आहे. मेट्रोचा अपवाद वगळता सार्वजनिक वाहतूक व्यवस्था व आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. त्यात प्रदूषणाची भर पडली आहे. दिल्लीची ही दुरवस्था जाणीवपूर्वक केवळ राजकारणासाठी केली जात आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना सध्या तुरुंगात असलेले मुख्यमंत्री केजरीवाल आणि त्यांच्या सरकारला लुळेपांगळे करून दिल्लीकरांना सध्या होत असलेल्या हालअपेष्टांना आम आदमी सरकारच जबाबदार असल्याचे चित्र दिल्लीतील महाशक्तीला उभे करायचे आहे. त्यासाठी कोणत्याही थराला जायची तयारी या मंडळींची आहे. लोकसभेला दिल्लीकर मोदींकडे पाहून भाजपला मतदान करतात हे खरे असले तरी इतर निवडणुकांमध्ये हेच दिल्लीकर ‘आपचा झाडू’ घेऊन भाजपची साफसफाई करतात हेही तितकेच खरे! मदनलाल खुराणा यांच्यानंतर तमाम दिल्लीकरांची मने जिंकणारा दुसरा नेता भाजपला तयार करता आलेला नाही. त्यामुळे दिल्लीकर ‘वश’ होत नसतील तर दिल्लीचा राज्याचा दर्जाच संपवू, असा एक विचार सध्या भाजपमध्ये घोळतो आहे. त्यामुळे दिल्लीला मेट्रोपोलिटन कौन्सिलचा दर्जा देऊन राज्य सरकार नावाची भानगडच संपुष्टात आणली जाऊ शकते, असा हा खतरनाक विचार आहे. मात्र असे केले तर भाजप केजरीवालांना घाबरली असा संदेश जनतेत जाईल व ‘आप’ला अधिकच सहानुभूती मिळेल. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत जोरदार मेहनत घेऊन सत्ता हाती घ्यावी, असे भाजपमधल्या सुज्ञांचे म्हणणे आहे. लोकसभेत भाजपचे सर्वच उमेदवार निवडून आले. भाजपने नुकत्याच केलेल्या सर्व्हेमध्ये विधानसभेसाठीही भाजपला अनुकूल स्थिती असल्याचे सर्वेक्षण आहे. केजरीवाल यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला तर दिल्लीत निर्णायक असलेल्या मुस्लिम व दलित व्होट बँकेपैकी तब्बल 65 टक्के व्होट बँक काँग्रेसकडे परत जाऊ शकते. या मतांच्या फाटाफुटीत भाजपचा फायदा होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.

सुगावा का लागला नाही?

मोदी नव्याकोऱया संसदेत येणारे पावसाचे पाणी व सीमेपलीकडून घुसखोरी करणारे चिनी सैन्य रोखू शकत नाहीत, मात्र ते रशिया व युक्रेनचे युद्ध फोनच्या एका रिंगवर रोखू शकतात, यावर मोदी भक्तांची अमाप व असीम अशी श्रद्धा आहे. मोदींचे कान व डोळे मानले जाणारे अजित डोवल यांच्या बाबतीतदेखील असेच नरेटिव्ह तयार करण्यात आले आहे. डोवल महाशय वेशांतर करून पाकिस्तानात वगैरे जातात, दहशतवाद्यांची बित्तंबातमी आणतात, मग आपले सैन्य दहशतवादी खतम करतात वगैरे वगैरे. मात्र बांगलादेशात नुकताच झालेला तख्तापलट व नेपाळमध्ये चीन समर्थक ओ.पी. शर्मांची झालेली पंतप्रधानपदी निवड, या दोन्ही गोष्टींचा साधा सुगावाही ‘लोकल जेम्स बॉण्ड’ना लागला नव्हता. वास्तविक, बांगलादेशातील सार्वत्रिक निकालानंतरच अमेरिकेने तिथल्या निकालाबद्दल नकारात्मक टिपणी केली होती. हिंदुस्थानच्या अगदी कुशीत असलेल्या या देशात भयंकर काहीतरी घडणार आहे, याची पुसटशीही कल्पना आपल्याला खुफिया यंत्रणेला नसावी याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. एकीकडे बांगलादेशचे अपयश सतावत असतानाच चीनच्या प्रेरणेने नेपाळमध्ये ओ.पी. शर्मा पुन्हा पंतप्रधान होत आहेत, तिथले सरकारही गडगडते आहे याचा अंदाज आपल्या गुप्तचरांना आला नाही.

अन्नामलाईंचा ठेंगा

भाजपच्या सोशल मीडियाने ‘साऊथ इंडियन हिरो’प्रमाणे क्रेझ बनविलेले भाजपचे तामीळनाडूचे प्रदेशाध्यक्ष अन्नामलाईंचा फुगा लोकसभा निवडणुकीतच फुटला. अन्नामलाई म्हणजे नवे युगपुरुष असल्याचा आभास निर्माण करत, आता हे महाशय दोन्ही द्रमुक पक्षांची सद्दी संपुष्टात आणून तामीळनाडूत ‘नवे युग’ निर्माण करतील, असे वातावरण भाजपाई मंडळींनी निर्माण केले होते. अन्नामलाई हे पूर्वाश्रमीचे आयपीएस अधिकारी. त्यामुळे एखाद्या साऊथ इंडियन सिनेमातील हिरोप्रमाणे त्यांची क्रेझ निर्माण करण्यात आली होती. प्रत्यक्षात लोकसभेचे निकाल हाती आल्यानंतर अन्नामलाई त्यांच्या क्रेझसकट आपल्या भक्त मंडळासोबत उताणे पडले. तामीळनाडूत भाजपचा सुपडा साफ झाला. कोईंबतूरसारख्या तुलनेने सोप्या मतदारसंघात अन्नामलाईंचा दारुण पराभव झाला. या पराभवानंतर अन्नामलाईंना प्रदेशाध्यक्षपदावरून हटविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्याच अनुषंगाने भाजपमधले व सरकारातल्या ‘नंबर टू’ यांनी अन्नामलाईंना उत्तराधिकारी नेमण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र अन्नामलाई यांनी आपण विदेशात चार महिन्यांचा ‘शॉर्ट टर्म कोर्स’ करण्यासाठी जात आहोत, त्यानंतर ही प्रकिया पार पाडावी, अशी विनंती हायकमांडकडे केली व सुट्टीसाठी अर्जही केला. मात्र दिल्लीतील हायकमांडने अजूनही अन्नामलाई यांची सुट्टी मंजूर केलेली नाही. अन्नामलाईदेखील शार्ट टर्म कोर्ससाठी हट्टाला पेटले आहेत. बाहेरून पक्षात घेतलेल्या लोकांवर विश्वास ठेवण्यात अर्थ नाही, असे हताश उद्गार यानिमित्ताने अमित शहा यांनी काढल्याची चर्चा आहे. विदेशातील सुट्टीऐवजी अन्नामलाईंना ‘कायमची सुट्टी’ देण्याचा भाजपचा मानस दिसतोय.