दिल्ली डायरी – कॉन्फरन्सिंगनंतर बदललेला सूर आणि नूर

2499

>> नीलेश कुलकर्णी

पंतप्रधान मोदी यांनी कोरोनासंदर्भात विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी अलीकडेच व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारा संवाद साधला. या बैठकीत प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांना खडे बोल सुनावले. कोरोनावरून राजकारण करू नका, ते नंतर करता येईल, पण सध्या वेळ कोरोनाशी एकत्रित लढण्याची आहे, असे दीदी म्हणाल्या. त्यात काही चुकीचे नाही. कोरोना विरुद्धच्या लढयात सुरुवातीला केंद्र सरकारच्या धोरणावर टीका होत होती, पण या कॉन्फरन्सिंगनंतर तर केंद्राचा सूर आणि नूर बदलला आहे. हे चांगलेच झाले.

देशभरात सध्या कोरोनाचे थैमान सुरु आहे. काही राज्यांत जास्त तर काही राज्यांत कमी असे प्रमाण असले तरी सर्वत्र कोरोनाने जनजीवन वेठीस धरले आहे. प्रत्येक राज्य सरकार आपापल्या परीने त्याविरुद्धचा लढा लढत आहे. केंद्र सरकारदेखील या लढाईत आहेच, पण तरीही केंद्र सरकारच्या कोरोनाविषयक काही धोरणांवर टीका झालीच. विरोधी पक्षांचे काम सरकारी धोरण आणि निर्णयांवर टीका करण्याचे आहेच. त्याला आक्षेप असण्याचे कारण नाही, पण कोरोनावरून केंद्र सरकारवर राजकारण करीत असल्याचे आरोप होणे केंद्रासाठी विचार करायला लावणारे आहे. गेल्या आठवडयात पंतप्रधान मोदी यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. कोरोनाविरुद्धच्या संघर्षाचा आढावा त्यामधून घेतला जातो. त्यामुळे अशा कॉन्फरन्सेस योग्य आणि आवश्यकच आहेत. तशी कॉन्फरन्स मागील आठवडयात झाली, पण त्यात प. बंगालच्या फायर ब्रँड मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदी यांना केंद्राच्या काही धोरणांबाबत खडे बोल सुनावले. सर्व काही राज्यांनी करावे, आम्ही फक्त उपदेश करू, हे धोरण आता चालणार नाही, कोरोनामध्येही राजकारण करू नका, कोरोनाची साथ ओसरल्यावर काय ते राजकारण करा, असे ममतादीदी यांनी या बैठकीत पंतप्रधान आणि केंद्र सरकारला फटकारले. असे म्हणतात की, या फटकाऱ्यानंतर कॉन्फरन्सचा नूर बदलला आणि केंद्राचा दृष्टिकोनदेखील. देशातील ‘कोरोना झोन’ केंद्र सरकार ठरवेल, त्याचा अधिकार केंद्राकडेच राहील आणि राज्यांनी त्यानंतर अंमलबजावणी करावी, असा सुर त्या बैठकीत उमटला होता. देशभरातील कोरोना झोन आपणच ठरवणार असा केंद्रीय गृह मंत्रालयाचा मनसुबा होता, पण भाजपशासित राज्यांसह इतर पक्षीय राज्य सरकारांनीही त्याला विरोध केला, तीव्र आक्षेप घेतला. त्यानंतर मग केंद्र सरकारने हा हट्ट सोडून दिला. कोरोनाविरुद्धच्या लढाईत केंद्र सरकार कमी पडत आहे अशी टीका सुरुवातीपासून होत होती. अगदी सुरुवातीला सरकारपक्ष कोरोनापेक्षा स्वत:च्या राजकारणात, सत्ताकारणात आणि विरोधी पक्षांची सरकारे पाडण्यात मग्न होता. मध्यप्रदेश हे त्याचेच उदाहरण आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद करा, विमानतळांवरच क्वारंटाईन केंद्रे सूरू करा अशा मागण्या केल्या होत्या, पण स्व राजकारणात मग्न असलेल्या केंद्रातील सत्ताधारी पक्षाने त्याकडे दुर्लक्ष केले. पाठोपाठ तब्लिघी प्रकरण उपटले. या सगळ्या गडबडीत कोरोना देशभर पसरला.पुन्हा वर शिरजोरपणा म्हणून राजकीय उखाळ्यापाखाळ्या काढण्याचे उद्योगही झाले. पंतप्रधान मोदी यांच्यासोबतच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये ममता दीदी भडकण्याचे कारण हेच होते. त्यातूनच त्यांनी पंतप्रधानांना खडे बोल सुनावले. केंद्राने राज्यांना समान वागणूक द्यावी असे त्या म्हणाल्या. केरळचे मुख्यमंत्री विजयन यांनी तर या बैठकीवर बहिष्कारच घातला होता. त्यांचे हे वागणेही चुकीचेच होते. अर्थात, आता वातावरण थोडे निवळल्यासारखे दिसत आहे. 20 लाख कोटींच्या पॅकेजच्या निर्णयाबरोबर इतरही काही ठोस निर्णय केंद्राने घेतले आहेत. त्याचा फायदा राज्यांना होणारच आहे. कोरोनाविरुद्धच्या लढयात केंद्राचा सूर आणि नूर बदलला हे चांगलेच झाले.

महाराज का धोका!
मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांचे काँग्रेस सरकार जाऊन भाजपचे शिवराजसिंग चौहान सरकार येऊन बरेच दिवस लोटले. देशात कोरोनाचा प्रवेश आणि मध्य प्रदेशातील हे सत्तांतर साधारण एकाच वेळेस झाले, पण अद्याप त्या राजकारणाचे कवित्व संपलेले नाही. मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांचे बूड स्थिर असले तरी होऊ घातलेल्या पोटनिवडणुका आणि त्याचे निकाल यावरही बरेच अवलंबून असेल. अजून या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही, पण कोरोना काळातही त्यांची पूर्वतयारी आणि बांधणी जोरात सुरु आहे. भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष त्याबाबत सावध आहेत. या पोटनिवडणुकीत चमत्कार झाला तर काँग्रेसची गेलेली सत्ता पुन्हा येईल असा तेथील काँग्रेसजनांचा दावा आहे. त्यातूनच जे आमदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासोबत भाजपमध्ये गेले त्यांच्या मतदारसंघात काँग्रेस पक्षातर्फे एक गाणे जोरात वाजवले जात आहे, ते म्हणजे ‘महाराज का धोका’. या गाण्यात काँग्रेसने ज्योतिरादित्य यांना व त्यांच्या खानदानाला काय काय दिले आणि त्याबदल्यात त्यांनी काँग्रेसला कसा धोका दिला, धोकेबाजी केली याचा दाखला दिला आहे. त्याचबरोबर शिंदे घराण्याच्या इतिहासातील काही घटनांचाही त्यात उल्लेख आहे असे सांगण्यात येत आहे. अर्थात, या गाण्याचा संबंध फक्त मध्य प्रदेशमधील पोटनिवडणुकीपुरता मर्यदित आहे त्यामुळे ही ‘टेप’ फारशी व्हायरल झालेली नाही. या टेप चा काँग्रेसला राजकीय फायदा होतो की नाही, हे तर प्रत्यक्ष पोटनिवणूक निकालानंतरच समजेल.

कॅ. अमरिंदर सिंग यांचा `’टिकटॉक’
पंजाबचीही कोरोनाशी लढाई सुरू आहे. त्यातच तिथे राजकारणही तापले आहे. केंद्राने राज्याला दिलेला भरघोस पैसा गेला कुठे, असा सवाल करत अकाली दलाच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री हरस्मिरत कौर यांनी मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग यांच्यावर निशाणा साधला आहे. अर्थात, हे असे राजकारण सुरू असताना कॅ. अमरिंदर सध्या `व्हायरल’ झाले आहेत ते त्यांच्या `टिकटॉक’ व्हिडिओमुळे. मात्र त्यासाठी मुख्यमंत्र्यांची लोकप्रियता कारणीभूत नाही. नूरप्रीत कौर या पाच वर्षांच्या टिकटॉक स्टार बालिकेने अमरिंदर यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन पोहोचवले आहे. सतनामसिंग नावाच्या एका वीटभट्टी मजुराची मुलगी असलेली आणि मुलाचा पेहराव करणारी नूरप्रीत सध्या पंजाबमध्ये `सुपरडुपर हिट’ आहे. तिच्या लोकप्रियतेची दखल आणि उपयोग करून घ्यावा, अशी कल्पना मुख्यमंत्री अमरिंदर यांच्या डोक्यात आली. तिच्या सोबत एक टिकटॉक करून जनतेने कोरोनाच्या बाबतीत काय दक्षता घ्यावी, यासंदर्भातील एक संदेश जनतेला दिला. हा व्हिडिओ तो चांगलाच हीट झाला. त्यामुळे जनतेत चांगला संदेशही गेला.

आपली प्रतिक्रिया द्या