दिल्ली डायरी – कर्नाटकातील नवे नाटक… येडियुरप्पांचे काय होणार?

>> नीलेश कुलकर्णी

कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे आता वय झाले आहे. त्यांना योग्य तो पर्याय आताच शोधला पाहिजे, असा एक जोरदार मतप्रवाह भाजपमध्ये आहे. मात्र येडियुरप्पांच्या ताकदीचा दुसरा नेता कर्नाटकात भाजपकडे नाही. त्यामुळे अडचण असली तरी आता आमदार बसनगौडा पाटील यतनाळ यांना पुढे करून येडियुरप्पा यांच्या विरोधात हुल उठवली जात आहे व त्याला दिल्लीकरांचा आशीर्वाद आहे असे बोलले जात आहे. कर्नाटकातील या नव्या राजकीय नाटकाचा शेवट येडियुरप्पा यांच्या गच्छंतीमध्ये होतो की येडियुरप्पा पुन्हा पुरून उरतात याचे उत्तर भविष्यातच समजेल.

‘मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पांचे काय होणार?’, हा सवाल सध्या कर्नाटकात विचारला जात आहे. अर्थात त्याला कारणीभूत ठरले आहेत ते येडियुरप्पांच्याच पक्षाचे एक आमदार बसनगौडा पाटील यतनाळ. येडियुरप्पांचे आता फार राजकारण उरलेले नाही. लवकरच त्यांना मुख्यमंत्रीपदावरून बाजूला केले जाईल, अशी हूल उठवून या बसनगौडांनी कर्नाटकाच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. येडियुरप्पांविरोधात हूल उठवणारे बसनगौडा सध्या केवळ आमदार असले तरी कधी काळी ते अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये मंत्री होते, त्यामुळे त्यांचे बोलणे सहज घेण्यात अर्थ नाही. बसनगौडांच्या दाव्याला बळकटी मिळणाऱया घटना सध्या घडत आहेत. भाजयुमोच्या अध्यक्षपदी कर्नाटकचेच तरुण खासदार तेजस्वी सूर्यांची निवड होणे आणि भाजपच्या केंद्रीय वर्तुळाच्या नजीकच्या अभिनेत्याच्या घरी मुंबईत कर्नाटक पोलिसांनी धाड घालणे या सगळ्या घटना एकमेकांना जोडून पाहिल्या जात आहेत.

कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे आता वय झाले आहे. त्यांना योग्य तो पर्याय आताच शोधला पाहिजे, असा एक जोरदार मतप्रवाह भाजपमध्ये आहे. मात्र येडियुरप्पांच्या ताकदीचा दुसरा नेता कर्नाटकात भाजपकडे नाही. भूतकाळातही येडियुरप्पांची उचलबांगडी करून सदानंद गौडा आणि जगदीश शेट्टर यांची मुख्यमंत्रीपदी निवड करणे भाजपला राजकीयदृष्टय़ा महागात पडले होते. भाजपला सत्तेतून बेदखल व्हावे लागले होते. त्यामुळे नाईलाजाने यावेळीही येडियुरप्पांच्या गळ्यात भाजपला मुख्यमंत्रीपदाची माळ घालावी लागली.

येडियुरप्पा हे केवळ शिमोगा या त्यांच्या मतदारसंघाचेच मुख्यमंत्री असल्यासारखे वागत आहेत. उत्तर कर्नाटकातील शंभर आमदारांची ते उपेक्षा करत आहेत. कर्नाटकाचा मुख्यमंत्री उत्तर कर्नाटकाचाच होईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे, अशी उजळणी करत बसनगौडा पाटील यतनाळ यांनी येडियुरप्पांविरोधात आघाडी उघडली आहे. बसनगौडा हे केवळ प्यादे असून सोंगटी हलविणारे दिल्लीत बसलेले आहेत, हे समजण्याएवढे येडियुरप्पाही दुधखुळे नाहीत. मुळातच कर्नाटकातही भाजपने सत्तेत शिरकाव केला तो साम, दाम, दंड, भेदाच्या जोरावर.

या सगळ्या खेळात माहीर असलेल्या येडियुरप्पांनी यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी बाजी मारली. वास्तिवक, दिल्लीश्वरांना येडियुरप्पांना कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री करायचे नव्हते. मात्र कर्नाटकात असे काही ‘राजकीय नाटक’ घडले की येडियुरप्पांशिवाय गत्यंतर उरले नाही. कर्नाटकाच्या राजकारणात येडियुरप्पा व बी. एल. संतोष यांच्यात सुरुवातीपासूनच छत्तीसचा आकडा आहे. भाजपच्या संघटनात्मक रचनेत अध्यक्षापेक्षाही महत्त्वाच्या मानल्या जाणाऱया संघटन सरचिटणीसपदावर सध्या संतोष विराजमान आहेत. त्यामुळे येडियुरप्पांची विकेट काढण्यासाठी ते कधीचेच आसुसलेले आहेत. मोदी-शहा यांचाही या मोहिमेला ‘छुपा आशीर्वाद’ आहे. मात्र वय वाढलेले असले तरी येडियुरप्पांना टक्कर देऊ शकेल, असा सक्षम नेता प्रदेश पातळीवर भाजपकडे नाही. नेमकी हीच भाजपची ‘अडचण’ आहे.

येडियुरप्पांना पदावरून हटवायचे ठरवलेच तर ते त्यांचे खासदार चिरंजीव किंवा खासदार असलेल्या शोभा पंरदजले यांचे नाव पुढे करण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेतृत्वबदलाचा पेच अधिकच चिघळण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत बिहारच्या विधानसभा निवडणुकीनंतर काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना ‘नारळ’ देण्याची भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची योजना असल्याचे बोलले जाते. येडियुरप्पांना ‘नारळ’ मिळतो की त्यांना नारळ देण्याचे मनसुबे बऱयाच दिवसांपासून रचणाऱयांनाच येडियुरप्पा ‘नारळ’ देतात याकडे पाहणे उत्सुकतेचे असेल.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या