लेख : दिल्ली डायरी : मध्य प्रदेशातील ‘काँग्रेसी’ खेळखंडोबा!

807

>> नीलेश कुलकर्णी 

कर्नाटकातील कुमारस्वामी सरकारला भाजपने सुरुंग लावल्यानंतरअब की बारी हमारीहे ओळखून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भाजपचेच आमदार गळाला लावले आणि आपले सरकार आणि खुर्ची शाबूत राखली आहे. तथापि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि कमलनाथ यांचेगुरूदिग्विजय सिंग यांची सुपर सीएमगिरी आणि त्याचवेळी ज्योतिरादित्य शिंदे यांनी घेतलेला बंडाचा पवित्रा यातून कमलनाथ कसा मार्ग काढतात हे भविष्यातच कळेल. तथापि या निमित्ताने काँग्रेसचा पराभव फक्त काँग्रेसच करू शकते आणि काँग्रेसची वासलात फक्त काँग्रेसच लावू शकते हे मध्य प्रदेशातील काँग्रेसी खेळखंडोब्याने पुन्हा एकवार सिद्ध केले आहे.

मध्य प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री कमलनाथ यांना उतारवयात मुख्यमंत्रीपदी बसविण्यासाठी त्यांचे पक्षातील गुरू आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी सगळी शक्ती पणाला लावली हे खरे असले तरी आता दिग्विजयमहागुरूबनूनसुपरसीएमसारखी बॉसगिरी करत असल्यामुळे कमलनाथ सरकारमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. मध्य प्रदेशचे एक मंत्री उमंग सिंगार यांनी दिग्विजय सिंगांवर ब्लॅकमेलर असल्याचा आरोप केला  असून त्यांची तक्रार हायकमांडकडे केली आहे. एकीकडे दिग्विजय कमलनाथ हे गुरूशिष्य आमनेसामने आलेले असतानाच या दोघांचे परंपरागत प्रतिस्पर्धी ज्योतिरादित्य शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकवत चिदंबरम यांच्यानंतर कमलनाथच तुरुंगात जातीलअशा पोस्टस् सोशल मीडियात समर्थकांकडून टाकून वातावरण तापवले आहे. कमलनाथ यांचे भाचे रतुल पुरी यांना ईडीने अटक केल्यानंतर ज्योतिरादित्य यांनी मुख्यमंत्रीपदावर डोळा ठेवून कमलनाथ हटाव मोहीम हाती घेतली आहे. एकीकडे गुरूंचासुपरसीएमगिरीचा मार तर दुसरीकडे शिंदे यांचे बंड यातून चतुर, सुजाण कमलनाथ कसा मार्ग काढतात ते यथावकाश कळेलच.

दिग्विजय राज्यसभेचे खासदार असले तरी सध्या सुपरसीएमसारखा त्यांचा मध्य प्रदेशात रुतबा आहे. तेथील कॅबिनेट मंत्र्यांना भेटीसाठी पाचारण करणे, बदल्या, बढत्या आणि कंत्राटाची कामे वाटणे यात सध्या ते जीवनाचा उत्तरार्ध सार्थकी लावत आहेत. ज्या मंत्रालयात दिग्विजय दहा वर्षे सन्मानाने मुख्यमंत्री म्हणून राहिले, त्याच मंत्रालयात मंत्र्यांच्या ऍण्टीचेंबरमध्ये बसून ते सुपरसीएमगिरीची हौस भागवून घेत आहेत. अर्थात एका दारू माफियामुळे ते अडचणीत आले आणि त्यांची ही नसती उठाठेव जगापुढे आली. दुसरीकडे मुख्यमंत्रीपद तर नाहीच, पण प्रदेशाध्यक्षपदही ही गुरुशिष्याची जोडी सहजासहजी मिळू देणार नाही हे लक्षात आल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांनी उघडपणे बंडाचा पवित्रा घेतला आहे. मुख्यमंत्रीपद सांभाळता सांभाळता दमछाक झालेल्या कमलनाथ यांना प्रदेशाध्यक्षपद आपल्याच समर्थकाच्या गळ्यात मारायचे आहे. वास्तविक कर्नाटकातीलमिशन लोटसयशस्वी झाल्यानंतर भाजप नेतृत्वाची करडी नजर मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारवर आहे. हे माहीत असूनही काँग्रेसमधील सावळा गोंधळ थांबण्याची चिन्हे नाहीत. मध्य प्रदेशातीलखेळखंडोबाभाजपला सत्तेचे आवतणच देत आहे.

pramod-jainगजेंद्रसिंग, भाया अन् पहचान कौन?

राजस्थानातील प्रमोद जैन ऊर्फ भाया नावाचे मंत्रीमहोदय केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींच्या ट्रफिक दंडाची पहिलीविकेटठरले आहेत. हल्ली राजकारण्यांमध्ये साधेपणाचे एक फॅड आलेले आहे. अण्णा मंडळातून स्फूर्ती घेतलेल्या अरविंद केजरीवालांसारख्यांनी सोंगांना खऱ्या अर्थाने सुरुवात केली. अनेक खासदारही संसदेत सायकलवर येऊन पर्यावरणाचा संदेश वगैरे देत असतात. एरवी ते कशाने फिरतात हा संशोधनाचा विषय, तर गडकरींच्या ट्रफिक रूलचा बळी ठरलेल्या जैन मंत्रीमहोदयांना त्यांच्या धर्मपत्नीने दुचाकीवर फिरण्याची इच्छा बोलून दाखविली. बायकोचीच इच्छा म्हटल्यावर मंत्रीमहोदय बाईकला किक मारून पुढे सरसावले खरे, मात्र डोक्यावर हेल्मेट घालायचे विसरून गेले. त्यांच्याच बारा नावाच्या शहरात ट्रफिक पोलिसांनी त्यांची गाडी अडवली आणि रीतसर दंड ठोठावला. बायकोसमोर कारवाई झाल्याने मंत्रीमहोदयांच्या चेहऱ्यावरचे रंग उडून गेले

दुसरीकडे केंद्रातले अन्य मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी दिल्लीत मेट्रोमध्ये एका खांबाजवळ gajendra-singhमोबाईल पाहत फरिदाबादपर्यंतचा प्रवास केला. आपला साधेपणा लोकांना समजावा म्हणून त्याच्या बातम्याही करण्यात आल्या. मात्र त्यावर विरोधकांनी टोमणा मारला आहे. ‘देशाचे मंत्री असूनही शेखावतांना पाऊण तासाच्या प्रवासात कोणी ओळखू नये हे दुर्दैव आहे! नाहीतर आमचे चिदंबरम पहा, सत्ता गेली तरीग्लॅमरकायम आहे. घोटाळे, लफडी, कुलंगडी केली तरी आमचे मंत्री किमान जनतेला तरीओळखायलायेतातअशी टोमणेबाजी काँग्रेसने केली आहे.

सिद्धरामय्या यांनी थप्पड का मारली?

s-ramayyaसिद्धरामय्या हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आहेत. मात्र कर्नाटकातले कुमारस्वामी सरकार गडगडताना भाजपच्या येडियुरप्पा यांच्या हास्याइतकेच सिद्धरामय्या यांच्या चेहऱ्यावरचेछद्मी हास्यअनेकांच्या स्मरणात असेल. असे हे सिद्धरामय्या कामापेक्षा वादामुळेच कायम प्रकाशझोतात असतात. देवेगौडांनी त्यांच्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला मोठे करून राज्याच्या राजकारणात आघाडीवर नेले. मात्र त्यांच्या उपकाराची परतफेड सिद्धरामय्या यांनी कुमारस्वामी यांच्या सरकारला सुरुंग लावत अपकाराने केली आहे. हा इतिहास ताजा असतानाच सिद्धरामय्या सध्या गाजत आहेत ते त्यांनी आपल्याच कार्यकर्त्याच्या श्रीमुखात लगावल्याने. तसा त्यांचाहाअनुभव नवा नाही. मुख्यमंत्री असतानाही त्यांनी एका महिलेला अर्वाच्य शिवीगाळ करत तिचा हात धरला होता. आता मैसूर विमानतळावर सर्वांसमक्ष त्यांनी आपल्याच कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली. सत्तेतून बेदखल झाल्यापासून कॉंगेसच्या नेत्यांचा ताळतंत्र सुटत आहे. सिद्धरामय्या हे त्याचाच नमुना मानावे लागतील. ईडीने एकीकडे काँग्रेसचे मंत्री राहिलेल्या शिवकुमार यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. अशावेळी सिद्धरामय्या यांनी कार्यकर्त्याला लगावलेल्या थपडीचा शिवकुमारांशी तर काही संबंध नाही ना अशी शंका आता उपस्थित केली जात आहे

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या