
>> नीलेश कुलकर्णी
उत्तर प्रदेशमधील सोनभद्र येथे झालेल्या आदिवासी हत्याकांडानंतर तेथे भेट देण्यासाठी निघालेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना योगी सरकारने मध्येच अडवले आणि स्थानबद्ध केले. प्रियंकांच्या भेटीचा उद्देश नक्कीच राजकीय होता, पण प्रशासनाच्या कारवाईमुळे त्यांना सहानुभूती आणि प्रसिद्धी मिळाली. 1977 मध्ये जनता पक्षाचे सरकार सत्तेवर असताना बिहारमधील बेलछीमध्ये दलितांचे सामूहिक हत्याकांड झाले होते. त्यावेळी विरोधी पक्षांत असलेल्या इंदिरा गांधी हत्तीवरून त्या गावात जाऊन पीडितांना भेटल्या होत्या. त्या बेलछीतील घटनेने इंदिरा गांधी आणि काँग्रेसला नवसंजीवनी दिली होती. सोनभद्रचे ‘बेलछी’ होऊ देऊ नका इतकेच!
उत्तर प्रदेशातील सोनभद्रमध्ये एकाच आदिवासी कुटुंबातील नऊ सदस्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येनंतर त्याचा राजकीय फायदा उठविण्यासाठी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी सोनभद्रकडे कूच केले, मात्र त्यांना पीडित कुटुंबाला भेटू देण्यास योगी सरकारने मज्जाव केला. इतकेच नाही तर त्यांना मिर्झापूरच्या गेस्ट हाऊसमध्ये अडवून ठेवण्यात आले. तेथील वीज घालवली गेली. इतके सगळे उपद्व्याप करूनही पीडित कुटुंब प्रियंकाना भेटलेच. प्रियंका लोकशाही मार्गाने पीडित कुटुंबाला भेटायला जात होत्या. त्यात गैर काहीच नव्हते, मात्र मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अतिउत्साहामुळे काँग्रेसला यानिमित्ताने नवसंजीवनी मिळण्याची चिन्हे आहेत. इतिहासाची पुनरावृत्ती होत असते असे म्हटले जाते. त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या इंदिरा गांधी सुरुवातीला रेल्वे, त्यानंतर जीप, ट्रक्टर व त्यानंतर त्या दुर्गम परिसरात चक्क हत्तीवर बसून पीडितांना भेटायला गेल्या होत्या. त्या बेलछीने जनता पक्षाची केंद्रातली सर्कस नंतर गुंडाळली गेली आणि आणीबाणीनंतरच्या नव्या ‘इंदिरा युगा’ला सुरुवात केली होती. इंदिरा गांधी आणि काँग्रेसला नवसंजीवनी दिली होती. सोनभद्रचे ‘बेलछी’ होऊ देऊ नका इतकेच!
वास्तविक, लोकशाही मार्गाने आंदोलने, गाठीभेटी घेण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे. मात्र सोनभद्रमध्ये जाण्यापासून काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना परावृत्त करून योगी सरकारने त्यांना अचानक प्रसिद्धीच्या झोतात आणले आहे. जे काँग्रेसला प्रयत्न करूनही जमले नाही ते या कारवाईने करून दाखवले. वास्तविक काँग्रेस अध्यक्षपदाचा तिढा अजून त्या पक्षाला सोडवता आलेला नाही. उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पुरती भुईसपाट झाली. पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना नेहरू-गांधी घराण्याचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीमध्ये पराभवाची धूळ चाखावी लागली. काँग्रेसची अशी मेल्यासारखी अवस्था झालेली असताना प्रियंकांनी सोनभद्रला भेट दिली असती तरी काही आकाश कोसळणारे नव्हते की योगींची खुर्ची त्यामुळे डळमळीत होणार नव्हती. उलट विरोधकांचाही योगी सन्मान ठेवतात असा मेसेज गेला असता, मात्र योगींच्या आडमुठय़ा भूमिकेमुळे प्रियंकांना देशभरात फुकटात सहानुभूती मिळाली. प्रियंकांच्या सोनभद्र भेटीचा उद्देशही समाजसेवेचा नक्कीच नव्हता. त्यामागेही राजकारण होतेच, मात्र प्रियंकाच्या राजकीय खेळीपुढे योगी फसले हे नक्की.
राज्यसभेतील बहुमताची लढाई
अमित शहा हे तसे गंभीर वृत्तीचे गृहस्थ. अमितभाईंनी कोणाला टाळी दिली आणि ते खळाळून हसत वगैरे आहेत असे चित्र कल्पनाचित्र ठरावे इतके ते गंभीरपणे काम करत असतात. मात्र अमितभाईंनी विनोद केला की काय असा गैरसमज झाला तो माकपाच्या त्रिपुरातील राज्यसभेच्या एकमेव खासदार झरना दास वैद्य यांचा. त्रिपुरातील पंचायत निवडणुकांमध्ये हिंसाचार सुरू असून तो रोखण्यासाठी केंद्राने हस्तक्षेप करावा या मागणीसाठी या झरनाबाई देशाचे गृहमंत्री असलेल्या शहा यांना भेटायला गेल्या. त्यांना पाच वाजताची वेळ मिळाली, मात्र तब्बल दोन तास त्यांना गृहमंत्र्यांची भेट मिळाली नाही. अखेर ही भेट झाल्यानंतर झरना यांनी आपली कैफियत शहांपुढे मांडली. त्यावर शहा यांनी, ‘आप उस पार्टी में क्यों हो, आप हमारी पार्टी जॉइन करो’, असा सल्ला दिला. त्यावर हार्डकोर कॉम्रेड असलेल्या झरना यांनी अमितभाईंना ‘मैं आपको देश के गृहमंत्री के रूप मे मिलने के लिए आयी हूं, ना की भाजपाध्यक्ष के रूप में’ असे सांगत गृहमंत्र्यांच्या केबिनमधून त्या ताडकन बाहेर पडल्या आणि पत्रकारांना हा किस्सा ऐकवला. वास्तविक, राज्यसभाही ‘काँग्रेसमुक्त’ करण्यासाठी भाजपचे जोरात प्रयत्न सुरू आहेत. तेलुगू देसमच्या चार खासदारांना राजीनामा द्यायला लावल्यानंतर समाजवादी पक्षाचे नीरज शेखर आणि लोकदलाचे रामकुमार कश्यप यांना राजीनामा द्यायला लावून भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. राज्यसभेतला बहुमताचा 123 सदस्यांचा आकडा गाठण्यासाठी भाजपश्रेष्ठाr सध्या ‘इनकमिंग’चा ‘गळ’ लावून बसलेले आहेत. झरना दास काही त्या गळाला लागल्या नाहीत, पण आणखी कोण कोण गळाला लागते ते यथावकाश कळेलच.
पत्रकारांचे बुरे दिन…
‘मोदी-2’ सरकार सत्तेवर आल्यानंतर सर्वप्रथम बुरे दिन कोणाला आले असतील तर ते पत्रकारांना. वास्तविक, मोदी-2च्या प्रेमात आणि भाजपच्या प्रचंड बहुमताच्या करिश्म्याच्या प्रेमात सुरुवातीला पत्रकारही पडले होते. मात्र केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या नार्थ ब्लॉकमधील कार्यालयात पीआयबीधारक पत्रकारांनाही येता येणार नाही किंवा कोणाला भेटताही येणार नाही, असा फतवा काढल्याने मीडिया वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. योगायोगाचा भाग म्हणजे निर्मलाबाईंच्या नॉर्थ ब्लॉकमध्येच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचेही कार्यालय आहे. म्हणजे या दोन्ही कार्यालयांकडे पत्रकारांना बातमीसाठीही फिरकता येणार नाही हे स्पष्ट झाल्याने पत्रकारांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. मोदी सरकार अशी कोणती माहिती दडवू पाहत आहे किंवा मीडियापासून का सुरक्षित अंतरावर राहात आहे, असा सवाल उपस्थित झाला आहे. ‘नॉर्थ ब्लॉक’पासून झालेली सुरुवात उद्या पंतप्रधानांचे कार्यालय असलेल्या ‘साऊथ ब्लॉक’ आणि राष्ट्रपती भवनापर्यंत जाऊन पोहचली तर पत्रकार म्हणून मिळणाऱया ‘ऍक्सेस’लाच मुकावे लागणार आहे. एकीकडे नॉर्थ ब्लॉकचा आदेश निघालेला असताना इलेक्ट्रॉनिक मीडियाचे काही पत्रकार, विशेषतः कॅमेरामनच्या अतिउत्साहामुळे संसदेतही खासदारांशी बोलताना आता मीडियाला (इलेक्ट्रॉनिक) काही बंधने पाळावी लागणार आहे. तृणमूल काँग्रेसच्या अभिनेत्री असलेल्या खासदार मिमी चक्रवर्ती आणि नुसरत जहाँ यांना बाईट घेताना काही कॅमेरामनकडून धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला. लोकसभा सभापतींनी त्याची गंभीर दखल घेत एक कडक सर्क्युलर काढून विशिष्ट अंतरावरूनच लोकप्रतिनिधींशी संवाद साधावा असे फर्मान काढले आहे. तेव्हा ‘मोदी-2’मध्ये आधीच बातम्यांची बोंबाबोंब आहे. पीआयबीधारक पत्रकारांची कोंडी करण्यात आली आहे ती वेगळीच. त्यात आता लोकसभा अध्यक्षांचे हे कडक सर्क्युलर. थोडक्यात, राजधानीतील पत्रकार सध्या ‘बुरे दिन’ची अनुभूती घेत आहेत हे नक्की.