दिल्लीचे पर्यावरणमंत्री गोपाल राय यांना कोरोनाची लागण

राजधानी नवी दिल्लीमध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दिल्लीत अनेक मान्यवरांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आता दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी ट्विटरवरून याबाबतची माहिती दिली आहे. याआधी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

‘काही लक्षणे दिसल्यानंतर आपली कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात आपल्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि कोरोना चाचणी करून घ्यावी,’ असे राय यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. दिल्लीत कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत असून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि सत्येंद्र जैन यांनाही कोरोनाचे संक्रमण झाले आहे.

राजधानी दिल्लीत गेल्या 24 तासात 5 हजारपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले आहेत. तर 99 जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्या आता 100 पेक्षा कमी झाली आहे. 20 ते 24 नोव्हेंबरदरम्यान दररोज 100 पेक्षा जास्त जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.  दिल्लीत गेल्या 24 तासात 5246 नवे रुग्ण आढळले असून कोरोनाबाधितांची संख्या 5,45,787 झाली आहे. तर आतापर्यंत 8720 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या 24 तासात 5361 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून एकूण 4,98,780 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

दिल्लीत सध्या 38,287 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. गेल्या 24 तासात 61,778 चाचण्या करण्यात आल्या आहेत. दिल्लीत कोरोनाचा रिकव्हरी रेट 91.38 टक्के आहे. तर मृत्यू दर 1.6 टक्के आहे. तसेच 23,102 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

 

आपली प्रतिक्रिया द्या