माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन

3303

माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली (66) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. शनिवारी दुपारी 12 वाजून 07 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या काही महिन्यांपासून ते सॉफ्ट टिशू सरकोमा या फुफ्फुसाशी संबंधित कर्करोगाने ग्रस्त होते. काही दिवसांपूर्वी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्यांच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा होत नसल्याने त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

जेटली यांना 9 ऑगस्टला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने रुग्णालयात जाऊन जेटली यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती. नंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि बसपाच्या प्रमुख मायावती यांनीही रुग्णालयात धाव घेत जेटली यांची विचारपूस केली. दरम्यान, 9 ऑगस्टपासून एम्समध्ये उपचार घेणाऱ्या जेटलींच्या प्रकृतीची माहिती देणारे मेडीकल बुलेटीन डॉक्टरांनी जारी केले नव्हते. यामुळे त्यांच्या तब्येतीविषयी तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र गुरुवारी त्यांच्या फुफ्फुसात पाणी जमा होत असल्याची व त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तियांनी दिली. त्यानंतर जेटली यांची भेट घेण्यासाठी सर्वच क्षेत्रातील व्यक्तींनी रुग्णालयात गर्दी केली होती.

जेटली यांना सॉफ्ट टिशू सरकोमा या फुफ्फुसाशी संबंधित कर्करोगाने ग्रासले होते. त्यांना मधुमेह देखील होता तसेच त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रियाही झाली होती. त्यानंतर ते वरचेवर आजारी पडू लागल्याने डॉक्टरांनी त्यांच्या काही वैद्यकीय चाचण्या केल्या. त्यात त्यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले. नंतर लगेचच जेटली उपचारासाठी अमेरिकेला रवाना झाले होते. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.

प्रकृती बिघडल्याने मोदी-2 सरकारमध्ये सहभाग नाही

दिल्ली विश्वविद्यालयाचे विद्यार्थी असलेले जेटली सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ वकीलही होते. मोदी सरकारच्या प्रथम कार्यकाळात त्यांनी अर्थमंत्रालयाचा पदभार सांभाळला होता. पण त्यानंतर त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांनी मोदी 2 सरकारमध्ये सहभाग घेतला नव्हता. माजी पतंप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार असताना जेटली केंद्रीय मंत्री होते. सर्वविषयांवर त्यांची पकड असल्याने संसदेत विरोधकांच्या प्रश्नांचे ते शांततेत निरसन करत. शांत व मनमिळावू स्वभावामुळे ते विरोधकांमध्येही प्रिय होते.

आपली प्रतिक्रिया द्या