शहीद जवानांच्या मदतीवर मारताहेत हात!

36

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

हिंदुस्थानी लष्कराचे आधुनिकीकरण आणि युद्धातील जखमी-शहीद जवानांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने 17 ऑक्टोबर 2019 रोजी एका पत्रकाद्वारे देशवासीयांना मदतीचे आवाहन केले होते. दिल्लीच्या साऊथ ब्लॉक येथील सिंडिकेट बँकेतील 9055200165915 या क्रमांकाच्या खात्यात (आयएफसी कोड -एएसवायएन बी 0009055) मदतीची रक्कम जनतेने जमा करावी, असे त्या पत्रकात नमूद केले होते.
मात्र मेरठमधील योगेश कुमार नावाच्या इसमाने त्या संरक्षण खात्याच्या आवाहनातील बँक खात्याच्या जागी स्वतःचा अकाऊंट नंबर – 88312200146028 (आयएफसी कोड एसवायएनबी- 00088831) टाकून मदतीचे आवाहन सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे उघडकीस आले आहे. त्याचे बँक खाते मेरठ येथील सिंडिकेट बँकेत आहे. पण त्याने खात्याचा बँकेत नोंद असलेला मेरठचा पत्ता अपडेट करून बदलला असून नवा पत्ता नोएडा येथील दिला आहे. सिंडिकेट बँकेचे अधिकारी आणि पोलीस सध्या योगेश कुमारच्या मागावर आहेत.

योगेश कुमारचे खाते केले ब्लॉक

योगेश कुमार याने शहीद आणि जखमी जवानांच्या मदतीसाठी देशवासीयांकडून मिळणारा पैसा स्वतःच्या बँक खात्यात वळविण्यासाठी केलेली लबाडी वेळीच सिंडिकेट बँकेच्या लक्षात आली. त्यानंतर बँकेने त्याचे खाते ब्लॉक करण्याची कारवाई केली आहे, अशी माहिती मेरठ येथील सिंडिकेट बँकेचे विभागीय व्यवस्थापक आय. जगदीशन यांनी दिली.
देशासाठी रक्त सांडणाऱया, बलिदान देणाऱया जवानांच्या नावे जनतेला ठकविण्याचा हा प्रकार म्हणजे ‘देशद्रोह’च म्हटला पाहिजे. बँकेने तक्रार दाखल करताच कठोर कारवाई केली जाईल. मेरठ परिक्षेत्राचे महानिरीक्षक राजकुमार वर्मा यांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या