शेतकरी आंदोलनात फूट, राजधानीतील अभूतपूर्व हिंसाचारानंतर ‘अलर्ट’

प्रजासत्ताकदिनी राजधानी दिल्लीत ऐतिहासिक लाल किल्ल्यासह अनेक ठिकाणी भडकलेल्या अभूतपूर्व हिंसाचारानंतर केंद्र सरकार ‘अॅक्शन’मध्ये आले आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत, योगेंद्र यादव, मेधा पाटकरांसह 37 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. 200वर जणांची धरपकड करण्यात आली असून, दिल्लीसह पंजाब, हरियाणात अलर्ट जारी केला आहे. या हिंसाचारात एक तरुण आंदोलकाचा मृत्यू झाला, तर 394 वर पोलीस जखमी आहेत. दरम्यान, शेतकरी आंदोलनात फूट पडली आहे. संसदेवरील 1 फेब्रुवारीला काढण्यात येणारा शेतकऱयांचा पायी मोर्चा रद्द करण्यात आला आहे.

मोदी सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱयांचे आंदोलन सुरू आहे. लाखो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर सिंधु, टिकरी, गाझीपूर आदी ठिकाणी कडाक्याच्या थंडीत ठाण मांडून बसले आहेत. गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून हे आंदोलन शांततेत सुरू होते. मात्र, प्रजासत्ताक दिनी आंदोलनाला हिंसक वळण लागले.

शांततेने आंदोलन सुरू असताना दिल्लीतील आयटीओ, लाल किल्ला, नागलोई, सिंघु, टिकरी बॉर्डर आदि ठिकाणी झालेला हिंसाचार निंदनीय आहे. शेतकऱयांच्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा हा प्रयत्न असून, हिंसाचारामागे घुसखोर आहेत, अशी भूमिका 40 शेतकरी संघटनांच्या संयुक्त किसान मोर्चाने जाहीर केले आहे.

शेतकऱयांना भडकवणारा दीप सिद्धू आहे कोण?

शेतकऱयांना भडकविल्यामुळे हिंसाचार भडकला. यामागे पंजाबी गायक-अभिनेता दीप सिद्धू आणि गँगस्टर लकखा सिधाना या दोघांचे नाव पुढे आले आहे. दीप सिद्धू हा भाजपचा कार्यकर्ता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर त्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. दीप सिद्धू भाजपचा असल्याचा आरोप शेतकरी नेते राजेश टिकैत यांनीही केला आहे.

अभयसिंह चौटालाचा आमदारकीचा राजीनामा

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा जाहीर करीत हरयाणातील इंडियन नॅशनल लोक दलाचे सरचिटणीस आमदार अभयसिंह चौटाला यांनी राजीनामा दिला आहे. जे लोक केंद्राच्या कृषी कायद्यांना विरोध करणार नाहीत त्यांना जनता मतदारसंघात येऊ देणार नाही हे लक्षात ठेवा, असा इशारा त्यांनी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांना दिला आहे.

…आणि भडका उडाला

  • केंद्र सरकारबरोबर चर्चेच्या अकरा फेऱया निष्फळ झाल्यानंतर शेतकऱयांनी प्रजासत्ताकदिनी राजधानी दिल्लीत ट्रक्टर मोर्चाचे आयोजन केले होते. पोलिसांबरोबर चर्चा करून शेतकरी नेत्यांनी ट्रक्टर परेडचा मार्गही निश्चित केला होता. सकाळी राजपथावर हिंदुस्थानी लष्कराचे सामर्थ्य अवघ्या जगाने पाहिले. या मुख्य सोहळय़ानंतर देशाच्या राजधानीचा नूरच पालटला.
  • 5 ते 7 हजार ट्रक्टर्स आणि लाखो शेतकरी. अनेक ठिकाणी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स ट्रक्टर्सनी तोडले. पोलिसांच्या अंगावर ट्रक्टर घालण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांच्या गाडय़ा तोडल्या. 300 वर पोलीस जखमी झाले. आंदोलकांकडे लाठय़ा-काठय़ा आणि तलवारी होत्या. पोलिसांनी अनेक वेळा अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडत लाठीमार केला. त्यात आंदोलक शेतकरीही जखमी झाले.

खुनाचा प्रयत्न, दंगली भडकविल्याचे गुन्हे

  • दिल्ली पोलिसांनी 26 शेतकरी नेत्यांवर खुनाचा प्रयत्न, लाल किल्ल्यावर दरोडा, घातक शस्त्र्ाांचा वापर, दंगल भडकविणे आदी 13 कलमांतर्गत हे गुन्हे दाखल आहेत.
  • गुन्हे दाखल झालेल्या नेत्यांमध्ये राकेश टिकैत, योगेंद्र यादव, मेधा पाटकर, कुलवंतसिंग संधु, बुटा सिंग, कवणलप्रीतसिंग पन्नू, सतनामसिंग पन्नू, सुरजितसिंग फुल, डॉ. दर्शन पाल, जोगिंदर सिंग, हरमीतसिंग कादियन, कविता, प्रेमसिंग गेहलोत, सतनाम सिंग भेरू आदींचा समावेश आहे.

नवरीत सिंहचा ट्रक्टर उलटल्याने मृत्यू

हिंसाचारात 27 वर्षीय नवरीत सिंहचा मृत्यू झाला. पोलीस गोळीबारात त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप होता. मात्र, पोस्टमॉर्टममध्ये गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे.

…आणि फूट पडली

गेले दोन महिने 41वर शेतकरी संघटनांची एकजूट देशाने पाहिली. पण, हिंसाचारानंतर शेतकरी आंदोलनात फूट पडली आहे. भारतीय किसान युनियनचे नेते ठाकूर भानुप्रताप सिंह आणि राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेचे व्ही. एम. सिंग हे आंदोलनातून बाहेर पडले आहेत. हिंसाचाराचा मार्ग ज्यांनी स्वीकारला आहे, त्यांच्यासोबत आम्ही आंदोलनात सहभागी होणार नाही, असे सिंग यांनी म्हटले आहे. राष्ट्रध्वज, देशाचा स्वाभिमान याचा सन्मान सर्वांनी राखला पाहिजे. ज्यांनी लोकांना भडकविले त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करून त्यांनी राकेश टिकैत यांच्यावर आरोप केला.

आपली प्रतिक्रिया द्या