पहिले राफेल 20 सप्टेंबरला हिंदुस्थानी हवाई दलाच्या ताफ्यात

1381
rafale-fighter

हिंंदुस्थानी हवाईदलाच्या ताकदीत मोठी वाढ करू शकणाऱ्या 36 हायटेक राफेल विमानातील पहिले विमान येत्या 20 सप्टेंबरला हिंदुस्थानच्या हवाली केले जाणार आहे. जी -7 देशांच्या शिखर परिषदेसाठी हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स दौऱ्यावर आहेत.या परिषदेच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅनुअल मॅक्रोन यांच्यात झालेल्या बैठकीनंतर मॅक्रोन यांनीच या निर्णयाची माहिती दिली.

फ्रान्स सरकार राफेल विमानांची आणखी दोन स्क्वॉड्रन्स म्हणजे 36 राफेल विमाने हिंदुस्थानी हवाई दलाला तत्काळ विकणार आहे. त्यामुळे हिंदुस्थानची हवाई ताकद प्रचंड प्रमाणात वाढणार आहे. दोन्ही देशांच्या शीर्ष नेत्यांच्या या बैठकीत संरक्षण आणि समुद्री सहयोगाबाबतही झालेल्या चर्चेत राफेलची पहिली खेप तात्काळ हिंदुस्थानकडे सोपविण्यास फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन यांनी मंजुरी दिली. फ्रान्सकडून मिळणारी 36 राफेल विमाने ठेवण्यासाठी लागणारी पुरेशी जागाही हिंदुस्थानकडे दोन एअरबेसवर उपलब्ध करण्यात आल्याचे गुरुवारी हिंदुस्थानी लष्कराच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते.

तीन वर्षांपूर्वी 2016 मध्ये फ्रान्स आणि हिंदुस्थान यांच्यात 36 राफेल विमानांबाबतचा सौदा झाला होता. त्यावेळी त्यांची किंमत 7.87 अब्ज युरो (जवळपास ६२५ अब्ज रुपये) ठरली होती. पण आणखी 36 राफेल मिळविण्यासाठी हिंदुस्थानला त्यापेक्षा कमी रक्कम अदा करावी लागणार आहे. कारण राफेल विमानांमध्ये हिंदुस्थानच्या वातावरणानुसार केले जाणारे बदल, ती चालवण्यासाठी प्रशिक्षण आणि त्यासाठीच्या पायाभूत सुविधा यासाठीची किंमत हिंदुस्थानने आधीच फ्रान्सला दिली आहे.

संरक्षण मंत्री आणि हवाईदलप्रमुखाच्या उपस्थित पहिल्या राफेलचा ताबा घेणार

राफेल विमानांची पहिली तुकडी हवाई दलाला 20 सप्टेंबरला मिळणार आहे. या विमानांचा ताबा घेण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि हवाई दलाचे प्रमुख बी. एस. धनोआ उपस्थित राहणार आहेत. या विमानांचा समावेश करून घेतल्यानंतर त्यांचा तत्काळ वापर करता यावा यासाठी 24 वैमानिकांना काही महिन्यांपासूनच प्रशिक्षण दिले जात आहे. नवीन मिळणार्‍या 36 राफेल विमानांपैकी एकेक विमान हरयाणा आणि अंबाला येथील एअरबेसवर ठेवण्यात येणार आहे. याशिवाय प. बंगालमधील हाशिमारा एअरबेसवरही एक राफेल विमान ठेवण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या