काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित मैदानात

सामना प्रतिनिधी। नवी दिल्ली

आम आदमी पार्टीसोबतची आघाडीची शक्यता पूर्णपणे मावळल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याच्या मुदतीच्या 48 तास अगोदर काँग्रेसने सोमवारी दिल्लीतील सातपैकी सहा जागांवरील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री व विद्यमान प्रदेशाध्यक्षा शीला दीक्षित यांना लोकसभेच्या रिंगणात पक्षाने उतरवले असून चिरंजीव संदीप यांच्याऐवजी नशीब अजमावणाऱया शीला यांचा मुकाबला उत्तर- पूर्व दिल्लीतून भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांच्याशी होणार आहे.

मंगळवारी (ता.23) लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस असला तरी आम आदमी पार्टी वगळता भाजप व काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना अजून उमेदवार यादीला अंतिम रूप देता आलेले नाही. ‘आप’ने यापूर्वीच सात जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत तर काँग्रेसने सातपैकी सहा जागांवरच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. त्यात शीला दीक्षित यांच्यासह माजी प्रदेशाध्यक्ष अजय माकन हे नवी दिल्लीतून तर माजी खासदार जयप्रकाश अगरवाल चांदणी चौक, महाबल मिश्रा पश्चिम दिल्ली, उत्तर-पश्चिम दिल्लीतून राजेश लिलोठिया तर पूर्व दिल्लीतून अरविंदरसिंग लव्हली यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दक्षिण दिल्लीतून काँग्रेसने उमेदवाराची अद्याप घोषणा केलेली नसून भाजपनेही दिल्लीतील तीन उमेदवारांची घोषणा अजून केलेली नाही.

हरयाणात हुडांना संधी
हरयाणातील सोनिपतमधून काँग्रेसने माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुड्डा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांचा मुकाबला भाजपचे रमेश कौशिक यांच्याशी होईल. हुड्डा यांचे खासदार सुपुत्र दीपेंद्र हे रोहतकमधून काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत.