‘विमानात दहशतवादी आहेत’ एकजण ओरडला; प्रवाशांमध्ये घबराट, अफवा पसरवणाऱ्याला अटक

दिल्लीहून गोव्याला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये गुरुवारी एका प्रवाशाने अफवा पसरवल्याने विमानातील इतर प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली. त्याने केलेल्या दाव्यामुळे सर्वच प्रवाशांच्या पायाखालची जमीनसरकली होती. मात्र, त्याच्या दाव्यात तथ्य नसून ती अफवा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रवाशांचा जीव भांड्यात पडला.

दिल्लीहून गोव्याकडे जाण्यासाठी विमानाने दिल्ली विमानतळाहून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच एक प्रवासी उभा राहिला. अचानक उभे राहत ‘या विमानात दहशतवादी आहेत. प्रत्येकाने सतर्क राहावे’ असे तो ओरडला. तसेच आपण दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकातील अधिकारी असल्याचे त्याने सांगितले. जिया उल हक असे या प्रवाशाचे नाव असून तो दिल्लीतील जामियानगरचा रहिवासी आहे.

जियाने केलेल्या दाव्यानंतर सर्व प्रवाशांमध्ये घबराट पसरली. मात्र, कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत प्रवाशांना शांत राहण्याचे आवाहन केले. विमान सुखरुपपणे गोवा विमानतळावर उतरल्यानंतर जियाने केलेला दावा म्हणजे अफवा असल्याचे स्पष्ट झाले. गोवा विमानतळावर उतरल्यावर जियाला अटक करण्यात आली.पोलीस त्याची चौकशी करत आहेत.

जियाची मानसीक संतुलन बिघडल्याने त्याने असा दावा केला असावा, असे त्याच्या कटुंबियांनी सांगितले. त्याच्या कटुंबियांनी दिलेल्या माहितीची पडताळणी करण्यात येईल. त्याची मानसीक तपासणी करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, विमानात अफवा पसरवल्याप्रकरणी त्याची चौकशी सुरू आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येतील, असे पोलिसांनी सांगितले. मात्र, चौकशीत त्याने उत्तरे दिली नाही.

पोलिसांनी जियाला आरोग्य तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात नेले होते. त्यानंतर त्याला महानगर न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. त्याला उपचारासाठी पणजीजवळील मनोविज्ञैान केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या