माहेरी जाण्याचा हट्ट महागात पडला, नवऱ्याने चावून नाकच तोडलं

28

सामना ऑनलाईन । लखनौ

नवरा बायकोमध्ये किरकोळ गोष्टींवरून वादावादी होणं ही तशी सामान्य बाब आहे. पण कधी कधी जर हा वाद विकोपाला गेला तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. असंच काहीसं उत्तर प्रदेशमधील बरेली येथे झालं आहे. पत्नी सतत माहेरी जाण्याचा हट्ट करत असल्याने एका मद्यधुंद पतीने रागाच्याभरात तिच्या नाकाचा चावा घेतला. ज्यात नाकच तुटल्याने तिला श्वास घेणेही कठीण झाले आहे. तसेच कृत्रिम नाकाची किंमत तिला परवडत नसल्याने सध्या या महिलेला कृत्रिम श्वास दिला जात आहे. या घटनेनंतर पतीने मात्र तिथून पोबारा केला आहे. संजय असे पतीचे नाव आहे.

सोमवारी  24 जून रोजी पत्नीने संजयला माहेरी जात असल्याचे सांगितले. यावर संजयने आक्षेप घेत कुठेही जाण्याची गरज नाही असे पत्नीला दरडावून सांगितले. पण पत्नी ऐकण्यास तयार नव्हती. तिने माहेरी जाण्याचा हट्ट धरला होता. पण तिचे वारंवार माहेरी जाणे संजयला आवडत नव्हते. यामुळे दोघांचे या मुद्दयावरून कडाक्याचे भांडण झाले. पत्नी उलट उत्तर देत असल्याने मद्यधुंद अवस्थेत असलेल्या संजयची संतापला. त्याने पत्नीस मारहाण करण्यास सुरुवात केली.

यामुळे चवताळलेल्या पत्नीने मदतीसाठी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. हे बघताच संजयने रागाच्या भरात तिच्या नाकाचा जोरदार चावा घेतला. यात तिचे नाकच तुटले. पत्नी रक्तबंबाळ झाल्याचे बघून हादरलेल्या संजयने घरातून पळ काढला.

त्यानंतर शेजाऱ्यांनी तिला ताबडतोब रुग्णालयात दाखल केले. पण नाकाला गंभीर दुखापत झाल्याने डॉक्टरांनी तिला कृत्रिम नाक लावण्याचा सल्ला दिला. त्यावरील शस्त्रक्रियेचा खर्च परवडणारा नसल्याचे महिलेने डॉक्टरांना सांगितले. यामुळे सध्या तिला कृत्रिम श्वासोश्वासावर ठेवण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या