पाकव्याप्त कश्मीरवर हल्ल्यासाठी कधीही तयार! -लष्करप्रमुख नरवणे

775

पाकव्याप्त कश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी हिंदुस्थानी सैन्याकडे अनेक योजना तयार आहेत. आम्ही कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी सक्षम आहोत. आम्हाला आदेश दिले गेले तर पाकव्याप्त कश्मीरवर हल्ल्यासाठी कधीही तयार आहोत, असे प्रतिपादन नवे लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी केले. हिंदुस्थानी सैन्य जम्मू आणि कश्मीरसह सर्व सीमांवर तैनात आहे. सैन्यावर जी जबाबदारी देण्यात आली आहे ती आम्ही यशस्वीरीत्या तडीस नेऊ असेही ते म्हणाले.

चीनच्या सीमेवर शांततामय वातावरण

चीनच्या सीमेवर शांततामय वातावरण असून त्या ठिकाणी कुठलीही समस्या नाही. दोन्ही बाजूला विकास होत आहे, रस्ते तयार करण्यात येत आहेत याकडेही जनरल नरवणे यांनी लक्ष वेधले. दरम्यान, सैन्यात भरती होताना राज्यघटनेचे सदैव पालन करू अशी शपथ जवानांना दिली जाते. त्यानुसार सैन्याकडून नेहमीच राज्यघटनेचे पालन केले जाईल, असेही जनरल नरवणे म्हणाले.

एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जनरल नरवणे यांनी हिंदुस्थानी लष्कर किती सक्षम आहे, दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी कुठली पावले उचलू शकते याबाबत सांगितले. पाकव्याप्त कश्मीरमध्ये घुसून तेथील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी हिंदुस्थानी सैन्य सातत्याने प्रयत्न करत राहील असेही जनरल नरवणे यावेळी म्हणाले. हिंदुस्थानी सैन्याकडे अनेक योजना आहेत. जेव्हा गरज पडेल तेव्हा त्यांची अंमलबजावणी केली जाईल, असे नरवणे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

हिंदुस्थानी सैन्याची खास रणनीती 

सीमारेषेपलीकडे दहशतवाद्यांचे अनेक तळ आहेत. ते उद्ध्वस्त करून दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी हिंदुस्थानी सैन्याने खास रणनीती आखली आहे. त्यानुसार आम्ही काम करत राहू. दहशतवाद्यांच्या तळांवर आमची नजर असून त्यांच्याबद्दल जसजशी आम्हाला खबर मिळत राहील त्यानुसार आम्ही योजना तयार करू, असेही जनरल नरवणे यांनी सांगितले. दरम्यान, हिंदुस्थानी सैन्य राजकारणापासून दूर असून सदैव दूरच राहील, असेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या