दिल्लीत महापालिकेत भाजपचा रडीचा डाव; ‘आप’ने आक्षेप घेतल्यानं राडा, महापौर निवडणूक पुन्हा पुढे ढकलली

ruckus between AAP, BJP MLCs

दिल्ली महानगरपालिकेच्या सभागृहात आप आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये झालेल्या गदारोळानंतर दिल्लीच्या महापौरपदाची निवडणूक पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे.

मंगळवारी दिल्ली महापालिकेच्या सभागृहाचे कामकाज महापौर आणि उपमहापौरांची निवड न करताच तहकूब करण्यात आले.

आदल्या दिवशी, पीठासीन अधिकारी सत्य शर्मा यांनी एमसीडी हाऊसमध्ये नायब राज्यपालांनी नवनियुक्त सदस्यांना शपथ दिली. शपथविधीनंतर महापौरपदाच्या निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया सुरू होणार असताना आपचे नगरसेवक मुकेश गोयल यांनी नामनिर्देशित सदस्यांना महापौरपदाच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार नसल्याचे सांगत आक्षेप घेतला.

मुकेश गोयल यांनी नामनिर्देशित सदस्यांना सभागृहाबाहेर काढण्याची मागणी केली. त्यांच्या या मागणीमुळे भाजपच्या नगरसेवकांनी विरोध केला आणि सभागृहात गदारोळ झाला. त्यानंतर पीठासीन अधिकारी सत्य शर्मा यांनी महापौर व उपमहापौरांची निवड न करता सभागृह तहकूब केले.

‘आप’ने शेली ओबेरॉय आणि आशु ठाकूर यांना महापौरपदासाठी उमेदवारी दिली आहे. भाजपने रेखा गुप्ता यांना उमेदवारी दिली आहे.

उपमहापौरपदासाठी ‘आप’कडून आले मोहम्मद इक्बाल आणि जलज कुमार आणि भाजपकडून कमल बागरी यांचा समावेश आहे.