दिल्ली मेट्रो चालवणार कुलाबा-सीप्झ भुयारी मेट्रो

मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो कुलाबा-वांद्रे-सीप्झचे (मेट्रो-3) संचलन आणि देखभाल दुरुस्तीचे काम दिल्ली मेट्रो करणार आहे. त्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन आणि दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन दरम्यान करार झाला आहे. मेट्रोच्या संचलनासाठी कंपनी निश्चित झाल्याने मेट्रो-3 प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसीएल) मेट्रो-3 च्या संचलनासाठी अंतरराष्ट्रीय निविदा मागवल्या होत्या. त्यानुसार आलेल्या निविदांमध्ये दिल्ली मेट्रोने (डीएमआरसी) सर्वात कमी किमतीची निविदा सादर केली होती. त्याची दखल घेत एमएमआरसीएलने त्यांच्याशी दहा वर्षाच्या संचलनाबरोबरच देखभाल-दुरुस्तीसाठी काम दिले आहे. दिल्ली मेट्रो ही देशातील मेट्रो रेल्वे क्षेत्रात आघाडीवर असून ते गेल्या दोन दशकांपासून मेट्रो गाड्यांचे संचलन आणि देखभाल दुरुस्ती करत आहे.