हवाई दलाच्या बेपत्ता विमानाचे अवशेष सापडले

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

हिंदुस्थानी हवाई दलाचे बेपत्ता लढाऊ विमान एएन -32 चे अवशेष दिसले आहे. अरुणाचल प्रदेशातील सियांग जिल्हय़ात घनदाट जंगलामध्ये आठ दिवसांनी हे अवशेष दिसले असून, शोध मोहिमेला वेग आला आहे. हवाईदलाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

3 जून रोजी एएन-32 या लढाऊ विमानाने आसाममधील जोराहट येथून उड्डाण घेतले आणि काही मिनिटातच विमानाचा असलेला संपर्क तुटला. विमानात हवाईदलाचे 13 कर्मचारी होते. गेले आठ दिवस शोधमोहिम सुरु होती. हेलिकॉप्टर्स, सॅटेलाईटद्वारे शोध घेतला जात होता. रशियन बनावटीचे एएन-32 घनदाट जंगल असलेल्या पहाडी प्रदेशात कोसळले असावे अशी शक्यता होती. मंगळवारी अखेर या विमानाचे अवशेष दिसल्याचे वृत्त आहे. दरम्यान, अवशेषांपर्यंत पोहचण्यासाठी आणखी दोन दिवस लागणार आहेत.

यापूर्वीही अनेक विमाने बेपत्ता झाली
पूर्व अरुणाचल प्रदेश भागात घनदाट जंगल आणि उंच पहाडी प्रदेश आहे. यापूर्वीही याप्रदेशात विमानांचे अवशेष मिळाले आहेत.
दुसऱया महायुद्धाच्या काळात अमेरिकन हवाई दलाची विमाने चीनमध्ये या मार्गाने जाताना या प्रदेशात कोसळली. जपानविरूद्ध लढण्यासाठी ही विमाने जात असत. तेव्हा काही विमाने कोसळली. त्याचे अवशेष आजही या अरुणाचलच्या पहाडांवर सापडतात, अशीही माहिती आहे.

विमानाने 3 जून रोजी दुपारी 12 वाजून 25 मिनिटांनी उड्डाण घेतले. त्यानंतर काही वेळानंतर या विमानाचा संपर्क तुटला.

विमानात 8 क्रू मेंबर आणि 5 प्रवासी
होते. हे विमान आसामच्या जोरहाट येथून अरुणाचल प्रदेशसाठी निघाले होते.