ममता दीदी माझ्यासाठी कुर्ते व मिठाई पाठवतात- मोदी

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच अभिनेता अक्षय कुमार याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली दिलखुलास मुलाखत चर्चेचा विषय़ ठरली आहे. कारण या मुलाखतीत मोदींनी काही नव्या गोष्टींबाबत पहिल्यांदाच वक्तव्य केलं. यात ममता दिदी दरवर्षी मला एक दोन कुर्ते आणि बंगाली मिठाई पाठवतात असेही त्यांनी सांगितले. विरोधकांमधील अनेक नेत्यांसोबत आपले चांगले संबंध असल्याचं मोदी या मुलाखतीमध्ये म्हणाले

अक्षय कुमार याने दोन दिवसांपू्र्वी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती. त्यात त्याने मी आतापर्यंत कधीही न केलेलं काम करणार असल्याचं सांगत चाहत्याच्या मनात उत्सुकता निर्माण केली होती. तेव्हापासून चाहते अक्षयच्या प्रत्येक पोस्ट व कार्यक्रमाकडे लक्ष ठेवून होते. याचदरम्यान बुधवारी सकाळी अक्षय मोदींची मुलाखत घेणार असल्याचं अनेक वृत्तवाहिन्यांनी जाहीर केलं. यामुळे आतापर्यंत एकही पत्रकार परिषद न घेणारे मोदी अक्षयला मुलाखतीत काय सांगणार याकडे सगळेजण नजर ठेऊन होते. त्यातच अक्षयने ही मुलाखत राजकीय नसून मोदींच्या आयुष्यातील कधीही समोर न आलेल्या पैलूंवर आधारित असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर अक्षयने मोदींना त्यांच्या खासगी आयुष्यावर बोलतं केले .त्याची उत्तर मोदींनीही दिलखुलासपणे दिली. यात मोदींच्या राजकारणी नेत्यांबरोबरीच्या मैत्रीबद्दल अक्षयने विचारले असता सगळ्यांबरोबरच आपले मैत्रीपूर्वक संबंध असल्याचे मोदी यांनी सांगितले.

“बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना वर्षातून 3-4 वेळा खास दिनी माझ्यासाठी ढाका येथून मिठाई पाठवतात. ममता दीदींना हे कळाल्यानंतर त्याही वर्षातून एक दोनदा माझ्यासाठी कुर्ते व मिठाई आवर्जून पाठवतात” असे मोदी यांनी अक्षय कुमारने घेतलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले