खासदारांना मिळणार फोर बीएचके फ्लॅट्स! पंतप्रधानांनी केले नव्या निवासाचे उद्घाटन

खासदारांना आता फोर बीएचके आलिशान फ्लॅट्स मिळणार आहेत. राजधानी दिल्लीत भगवान दास मार्गावर बांधण्यात आलेल्या गंगा, यमुना व सरस्वती अपार्टमेंटमध्ये खासदारांना हे सर्व सोयींनी युक्त फ्लॅट्स सरकारी निवासस्थान मिळणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या नवीन निवासस्थानांचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले.

दिल्लीत नव्या खासदारांना नेहमीच सरकारी बंगला मिळण्यासाठी धावाधाव करावी लागते. जुने मंत्री, खासदार बंगला सोडेपर्यंत नव्या खासदारांना वाट बघावी लागते. त्यामुळे बीडी मार्गावर गंगा, यमुना व सरस्वती या अपार्टमेंटमध्ये जवळपास 218 कोटी रुपये खर्चुन एकूण 76 फ्लॅट्स बांधण्यात आले आहेत.

खासदारांना देण्यात येणाऱया या फ्लॅट्समध्ये नोकरांसाठी तसेच स्वीय सहायकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. मोडय़ूलर किचन असून येथे खासदारांना आपल्या जेवणाची व्यवस्था करता येणार आहे. त्याचबरोबर स्वतंत्र पुजाघरही देण्यात आले आहे. बाथरूममध्ये सर्व अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. चारही बेडरूम अटॅच्ड असून खासदारांना आपले कार्यालयही या फ्लॅटमध्ये थाटता येणार आहे.

ऐंशी वर्षे जुने असलेले आठ बंगल्यांच्या जागेवर हे गंगा, यमुना व सरस्वती टॉवर्स उभारण्यात आले आहेत. मोनोलिथिक तंत्रज्ञानाचा वापर बांधकामासाठी करण्यात आला आहे. बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या विटा राख, कचरा तसेच डब्बरपासून बनवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे पर्यावरणाचे विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे. प्रत्येक अपार्टमेंटमध्ये चार लिफ्ट देण्यात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या