कन्व्हेयर बेल्टमधून आता सामान चोरी होणार नाही

66

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

विमानप्रवास करायचा म्हटलं की त्याचा आनंद घेण्यापेक्षा आपले सामान सुखरूप राहील का हीच काळजी प्रवाशांना जास्त सतावते. पण आता विमानतळावरही निर्धास्त राहता येणार आहे. कारण विमानतळांवर आता प्रवाशांचे सामान चोरी होणार नाही. एवढेच नाही, तर या प्रवाशांना कन्वेयर बेल्टमधून आपले सामान घेणेही सुलभ होणार आहे. लवकरच अशा प्रकारची सिस्टीम प्रत्येक विमानतळावर बसविली जाणार असून दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल-3 वर लवकरच त्याची सुरुवात होणार आहे.

पंजाबमधील ‘लव्हली प्रोफेशन युनिव्हर्सिटी’च्या संशोधकांनी ‘दी नॉवेल सॉल्युशन’ नावाची एक स्मार्ट सिस्टीम विकसित केली आहे. ज्यामुळे विमानतळांवरील सामानचोरी रोखता येणार आहे. या सिस्टीमच्या मदतीने एखाद्या प्रवाशाचे सामान घेऊन दुसरा कुणीही विमानतळाचे गेट पार करू शकणार नाही. एवढेच नाही तर एखादा प्रवासी आपले सामान विसरला, तर या सिस्टीममुळे ते सामान कोठे आहे याचाही तपास लावता येणार आहे.

प्रशासनासाठीही फायद्याचे!
‘दी नॉवेल सॉल्युशन’ ही सिस्टीम केवळ प्रवाशांचे सामान शोधण्यासाठीच उपयुक्त आहे असे नव्हे, तर ही सिस्टीम विमानतळ प्रशासनालाही फायद्याची ठरेल असा दावा एलपीयू युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केला आहे. कारण प्रशासनाला कन्वेयर बेल्टद्वारे प्रवाशांचे सामान प्रवाशांपर्यंत पोहोचविण्यासाठी मोठा खटाटोप करावा लागतो. त्या सामानाची चोरी रोखण्यासाठी सिक्युरिटी गार्डस् नेमावे लागतात. प्रशासनाचा हा सर्व त्रास वाचणार आहे, असेही संशोधकांचे म्हणणे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या