राममंदिर ट्रस्टमध्ये प्रमुख पदे द्या!- निर्मोही आखाडा

280

ऐतिहासिक अयोध्या खटल्यातील प्रमुख पक्षकार निर्मोही आखाडय़ाचे प्रतिनिधी या आठवडय़ातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. राममंदिर उभारणीच्या ट्रस्टमध्ये आम्हाला अध्यक्ष किंवा सचिव यांसारखी प्रमुख पदे देण्यात यावीत असे साकडे आखाडय़ातर्फे पंतप्रधानांना घातले जाणार आहे.

राममंदिर उभारणीसाठी तीन महिन्यांत ट्रस्ट स्थापण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. या ट्रस्टमध्ये निर्मोही आखाडय़ाला योग्य प्रतिनिधित्व मिळावे, रामलल्ला पूजेचा हक्क रामानंदी संप्रदायाला मिळावा अशा विविध मागण्यांसाठी सोमवारी आखाडय़ाचे प्रमुख महंत आणि कार्यकारी मंडळातील सदस्यांची बैठक झाली. या वेळी ट्रस्टच्या व्यवस्थापनातील प्रमुख पदे मिळवण्यासाठी पंतप्रधान मोदी यांना भेटण्याचा निर्णय घेण्यात आला. आखाडय़ाचे प्रवक्ते रणजीत लाल वर्मा यांनी ही माहिती दिली.

पंतप्रधानांच्या भेटीनंतर पुढची रणनीती ठरवणार!

पंतप्रधान मोदी आमच्या मागण्यांबाबत काय भूमिका घेतात ते पाहून पुढची रणनीती ठरवली जाईल. निकालात नमूद केल्यानुसार राममंदिरसाठी योग्य जागा दिलीय का यावर चर्चा करण्यासाठी आखाडय़ाच्या कार्यकारी मंडळाची पुन्हा बैठक घेतली जाईल, असे वर्मा यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या