आयएसआय करतेय दहशतवाद्यांची भरती

351

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जम्मू-कश्मीरला विशेष दर्जा देणारे 370 कलम हटवल्याने पाकिस्तान बिथरला आहे. जम्मू-कश्मीरसह हिंदुस्थानमधील महत्वाच्या शहरांमध्ये दहशतवादी हल्ले घडवण्याचा कट पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयने रचला आहे. त्यासाठी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून हिंदुस्थानात घुसखोरी करण्यासाठी दहशतवाद्यांची भरती आयएसआयने सुरू केल्याची खळबळजनक माहिती हिंदुस्थानच्या गुप्तचर संघटनेने दिली आहे.

आयएसआयने मुजफ्फराबाद येथील बसनाडा मध्ये छावण्या उभारल्या आहेत. येथील स्थानिक तरुणांना हिंदुस्थानविरोधात भडकवून त्यांना दहशतवादी हल्ल्याचे प्रशिक्षण या छावण्यांमध्ये दिले जात आहे. प्रशिक्षण चाचणीत उत्तीर्ण झाल्यानंतर तरुणांना अल बदर या दहशतवादी संघटनेत भरती केले जात आहे. लीपा आणि केरन सेक्टर येथील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून घुसखारी करण्यासाठी या तरुणांना आयएसआय तयार करत आहेत. तसेच पेशावर आणि क्वेट्टा येथील अनेक ग्रामीण भागातील तरुणांबरोबरच पूंछ बाग आणि कोटली येथेही ही भरती प्रक्रिया सुरू आहे. त्याचबरोबर 9 ऑगस्टपासून आयएसआयने या दहशतवाद्यांना पाण्याखालून कसे हल्ले करायचे याचे प्रशिक्षण देणे सुरू केले आहे. हे प्रशिक्षण मीरपूर आणि स्यालकोट येथील प्रशिक्षण शिबीरात दिले जात आहे.

तर दुसरीकडे हिंदुस्थानच्या बालाकोट येथील सर्जिकल स्ट्राईकनंतर जे दहशतवादी तळ हलवण्यात आले होते. त्यांच्यासाठी नवीन तळ उभारण्यात येत असून तेथेही आयएसआयने प्रशिक्षण शिबीर सुरू केले आहेत. जवानांवर हल्ले करण्यासाठी येथे तरुणांना प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती गुप्तचर संस्थेच्या हाती लागली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या