बीटींग द रिट्रीटमध्ये फुकाचा रुबाब दाखवताना पाकिस्तानी सैनिक धडपडला

2417

पंजाबमधील अटारी वाघा बॉर्डरवर बीटींग द रिट्रीट संचलनादरम्यान अतिआक्रमकपणा दाखवणे एका पाकिस्तानी सैनिकाला चांगले महागात पडले आहे. जोशात पाय आपटताना हा सैनिक असा काही धडपडला की त्याच्या डोक्यावरची पगडी देखील पडली. पण प्रसंगावधान ओळखून दुसऱ्या सैनिकाने धडपडणाऱ्या सैनिकाला आणि त्याच्या पगडीला वेळीच सावरले. अन्यथा जगभरात पाकिस्तानी सैनिकांचे हसे झाले असते. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

पण हा व्हिडीओ नेमका केव्हाचा आहे हे मात्र अद्याप समजलेले नाही. अटारी-वाघा बॉर्डरवर रोज संध्याकाळी बीटींग द रिट्रीट कार्यक्रम पाहण्यासाठी दोन्ही देशातील हजारो नागरिक गर्दी करत असतात. यावेळी देशभक्तीपर गाणी वाजवण्यात येतात. यामुळे सारा माहोलच वेगळा असतो. सगळे नागरिक आपआपल्या देशांचा जयजयकार करत असतात. अशा देशभक्तीपर वातावरणात दोन्ही देशातील सैनिक पाय आपटत आक्रमक मुद्रेत एकमेकांना बघत बीटींग द रिट्रीट परेड करतात व आपआपल्या देशांचे झेंडे उतरवतात. हा कार्यक्रम लोकांमध्ये देशभक्ती जागवण्यासाठी असल्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे. त्याचा थेट संबंध देशप्रेमाबरोबरच आमचे सैन्य किती तयार आहे हे दुसऱ्या देशाला दाखवण्यासाठीही जोडला जातो.

पण याच कार्यक्रमात एका पाकिस्तानी सैनिकाला जास्तच जोश चढला आणि त्याच जोशात जमिनीवर आपटण्यासाठी त्याने पाय उचलला पण तो धडपडला आणि त्याच्या डोक्यावरची मानाची पगडीही खाली पडली. पण त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या सैनिकाने पुढे येत त्याला सांभाळले व त्याची पगडीही सावरली. यावेळी सगळ्यांच्याच नजरा आपआपल्या सैनिकांवर खिळलेल्या होत्या. यामुळे सैनिक धडपडल्याचे बघून सगळेजण अवाक झाले. कडक शिस्त बाळगणारे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सैनिकाकडून अशी चूक होणे अनपेक्षित होते. त्यानंतर या बीटींग द रिट्रीटचा व्हिडीओ व्हायरल झाला. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनीही हा व्हिडीओ दाखवला असून धडपडणाऱ्या सैनिकाला लोकांनी धांदरट म्हणून ट्रोल केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या