पालघरसह देशभरात भूकंपाचे धक्के

34

नवी दिल्ली/पालघर । प्रतिनिधी

शनिवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनी पालघर-डहाणूसह देशभरातील अनेक राज्ये हादरली. हिमाचल प्रदेश आणि सोनीपतमध्ये हे झटके जाणवले.

3.5 रिश्टरचा थरथराट

नोव्हेंबरपासून एकापाठोपाठ एक भूकंपाचे धक्के सहन करणारी डहाणूमधील धुंदलवाडी शनिवारी पुन्हा हादरली. सकाळी 9.17 वाजण्याच्या सुमारास 3.5 रिश्टर स्केल भूकंपाचा पहिला मोठा धक्का बसला. त्यानंतर दुपारपर्यंत सलग भूकंपाचे हादरे बसतच होते. त्यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले असून जीव वाचवण्यासाठी ऐन पावसाळ्यात घराबाहेर मुक्काम ठोकावा लागत आहे.

धुंदलवाडीत शुक्रवारी रात्रीपासून भूकंपाचे हादरे बसण्यास सुरुवात झाली. शनिवारी सकाळी आठच्या सुमारास पहिला 3.5 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला. त्यानंतर दुपारपर्यंत हे हादरे सुरूच होते. भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी अथवा आर्थिक नुकसान झाले नाही.

पहिला धक्का पहाटे 4.24
अरुणाचल प्रदेशात पहाटे 4 वाजून 24 मिनिटांनी भूकंपाचा पहिला धक्का बसला. रिश्टर स्केलवर त्याची तीक्रता 5.5 तर केंद्र अरुणाचलमधील कामेंग येथे होते.

सोनीपत सकाळी 7.43

दिल्ली शेजारच्या हरियाणातील सोनीपत जिह्यात सकाळी 7 वाजून 43 मिनिटांनी दुसरा झटका बसला. सुमारे 30 सेकंद हे धक्के जाणवल्याचे नागरीकांनी सांगितले. सोनीपतपासून 5 किमी अंतरावर या भूकंपाचा केंद्रबिंदू होता आणि तीव्रता 3.2 रिश्टर स्केल होती.

नऊ महिन्यांत 20 हादरे
डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी, कंकास, हळदपाडा, बहारे, सासकद यांसारख्या गावांना नोव्हेंबर 2018 पासून लहानमोठे सतत भूकंपाचे धक्के बसत आहेत. गेल्या नऊ महिन्यांत भूकंपाचे 20-25 मोठे धक्के बसल्याने गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. भूकंपाच्या भीतीने गावकऱयांनी मध्यंतरी घरावरची कौले उतरवली होती, मात्र सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने पुन्हा घरांवर कौले लावली असून सततच्या भूकंपाने कधी छत डोक्यावर कोसळेल या चिंतेने ते धास्तावले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या