पेपर लीक प्रकरणात दोन शिक्षकांसह तिघांना अटक

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

केंद्रीय माध्यमिक शालान्त परीक्षेतील (सीबीएसई) इयत्ता बारावीचा अर्थशास्त्राची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या गुन्हा शाखेने एका खासगी शाळेतील दोन शिक्षकांसह एकूण तिघांना अटक केली आहे.

सीबीएसई पेपर लीकप्रकरणी दिल्लीनजिकच्या बावना परिसरातील खासगी शाळेतील शिक्षक रिषभ आणि रोहित या दोघांसह बावना येथील कोचिंग सेंटरमधील टय़ूटर तौकीर याला पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तौकीर याने परीक्षेपूर्वी एक तास अगोदर अर्थशास्त्राचा पेपर फोडून तो दोन शिक्षकांच्या व्हॉटस् ऍपवर फॉरवर्ड केला. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी दोन गुन्हे नोंदविले आहेत. अर्थशास्त्राचा पेपर फुटल्याप्रकरणी २७ मार्च रोजी गुन्हा नोंदविण्यात आला. तर गणिताचा पेपर फुटल्याप्रकरणी सीबीएसईच्या प्रादेशिक संचालकांनी २८ मार्च रोजी यांनी तक्रार नोंदविल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा शाखेने सीबीएसई पेपर लीकप्रकरणी ६० हून अधिक लोकांची तपासणी केली होती. यात पेपर लीक शेअर करणाऱ्या १० व्हॉटस्ऍप ग्रुपचा समावेश आहे. मात्र पेपर शेअर केल्याबद्दल पैशाचे व्यवहार झाले नाहीत असे पोलिसांचे म्हणणे आहे.