Rahul Gandhi राहुल गांधी यांच्या घरी दिल्ली पोलिसांचे पथक दाखल, काय आहे प्रकरण?

काँग्रेस खासदार राहुल गांधी (Congress MP Rahul Gandh) यांच्या घरी दिल्ली पोलिसांचे पथक दाखल झाले आहे. ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान (Bharat Jodo Yatra) राहुल गांधी यांनी केलेल्या एका विधानाप्रकरणी पोलीस त्यांच्या घरी पोहोचले आहेत.

‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी जम्मू-कश्मीरमधील श्रीनगर येथे केलेल्या एका विधानाबाबत दिल्ली पोलिसांनी त्यांना नोटीस पाठवून लैंगिक छळ पीडितांची माहिती मागवली होती. मात्र या नोटीसला कोणतेही उत्तर न मिळाल्याने रविवारी सकाळीच दिल्ली पोलिसांचे विशेष पोलीस आयुक्त सागर प्रीत हुड्डा (Sagar Preet Hooda) आपल्या पथकासह राहुल गांधी यांच्या निवासस्थानी दाखल झाले. ‘एएनआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.

राहुल गांधी यांनी 30 जानेवारी, 2023 ला श्रीनगरमध्ये एक विधान केले होते. भारत जोडो यात्रेदरम्यान आपण अनेक महिलांना भेटलो असून त्यांनी आपल्यावर बलात्कार झाल्याचे सांगितल्याचे राहुल गांधी म्हणाले होते. याच संदर्भात आम्ही त्यांच्याशी बोलण्यासाठी आलो आहोत. आम्ही त्यांच्याकडून तपशील मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत, जेणेकरून पीडितांना न्याय मिळू शकेल, असे विशेष पोलीस आयुक्त सागर प्रीत हुड्डा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

हे देखील वाचा – लंडनमधील विधानाचे संसदीय समितीच्या बैठकीत पडसाद, भाजपकडून घेरण्याचा प्रयत्न; राहुल गांधींच्या उत्तराने बोलती बंद

दरम्यान, राहुल गांधी यांच्या निवासस्थानी पोलीस दाखल झाल्याची माहिती मिळताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी आले. परंतु पोलिसांनी त्यांना बाहेरच रोखले आणि घराबाहेर बॅरिकेट्स लावले. मात्र नंतर त्यांना परवानगी देण्यात आली.

सरकार घाबरल्याचा पुरावा

राहुल गांधी यांना नोटीस पाठवण्यात आल्यानंतर काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला होता. पंतप्रधान मोदी आणि अदानी यांच्यातील संबंधांवर राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे अस्वस्थ झालेले सरकार पोलिसांच्या मागे लपत आहे. ही नोटीस म्हणजे सरकार घाबरल्याचा पुरावा असून कायद्यानुसार योग्य वेळी नोटीसला उत्तर देऊ, असे काँग्रेसने म्हटले होते.