पैलवानांविरुद्ध दिल्ली पोलिसांची तक्रार, जंतरमंतरवर आंदोलन करण्याची परवानगी नाकारली

रविवारी एकिकडे नव्या संसदेचे लोकार्पण होत असतानाच दुसरीकडे आंदोलनकर्त्या पैलवानांवर पोलिसांचा दंडुका चालवण्यात आला. कुस्तीपटूंनी बॅरिकेट्स ओलांडून नव्या संसद भवनाकडे कूच करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना पकडून अक्षरशः फरफटत नेण्यात आलं. आंदोलनकर्त्या पैलवानांना पोलिसांनी व्हॅनमध्ये डांबलं. यानंतर आता दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटूंविरोधात तक्रार दाखल केली असून त्यांना जंतरमंतरवर आंदोलन करण्यास परवानगी नाकारली आहे.

भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणाचा आरोप करत गेल्या 23 एप्रिलपासून महिला कुस्तीपटूंचे आंदोलन सुरू आहे. कुस्तीपटूंनी रविवारी नवीन संसद भवनापर्यंत शांततापूर्ण मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. त्यानुसार रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास कुस्तीपटूंचा मोर्चा निघाला. मात्र, हा मोर्चा पोलिसांकडून रोखण्यात आला. पोलिसांकडून कुस्तीपटूंना अमानुष वागणूक देण्यात आली. साक्षी मलिक, विनेश फोगाट यांना पोलिसांनी अक्षरशः फरफटत नेले. जंतरमंतरवरील तंबूही पोलिसांनी उखडून फेकला.

या झटापटीत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला होता. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी पैलवानांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार, देशाच्या एका सर्वोच्च संवैधानिक संस्थेच्या इमारतीचं उद्घाटन रविवारी होतं. ज्यांचं संरक्षण आणि सन्मानाची जबाबदारी पोलिसांवर होती. त्यामुळे त्या संस्थेच्या सुरक्षा आणि सन्मानासोबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. आणि ज्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा आणणं हे राष्ट्रीय प्रतिष्ठेला हानी पोहोचवल्याप्रमाणे होईल. याबाबत पैलवानांना सूचना केली होती मात्र त्यांनी ती सूचना ऐकली नाही, असं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.

दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, गेले 38 दिवस पैलवानांचं आंदोलन सुरू आहे. आम्ही त्यांना हरप्रकारे साहाय्य केलं. त्यांच्या आंदोलनांना परवानगी दिली. रविवारी होणाऱ्या कार्यक्रमाविषयीही त्यांना माहिती होती. त्यांना आम्ही तिथे जाण्याची परवानगी नाकारली होती. तरीही ते त्याचवेळी तिथे आले. त्यांनी बॅरिकेड्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. एवढे मोठे खेळाडू असूनही त्यांचं वर्तन योग्य नव्हतं. त्यांनी आमच्या महिला पोलिसांनाही धक्काबुक्की केली आणि सगळं नाटक रचलं. दिल्ली पोलिसांनी त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप साफ चूक आहे, असं पोलिसांच्या प्रवक्त्या सुमन नालवा यांचं म्हणणं आहे. आता पैलवानांचं वर्तन पाहता त्यांना जंतरमंतरवर आंदोलन करण्याची परवानगी नाकारण्यात आली असून अन्य कोणत्याही ठिकाणी आंदोलन करायचं असल्याच विचार केला जाईल, असंही पोलिसांचं म्हणणं आहे.