दिल्लीत हवेनंतर आता दूषित पाण्यावरून राजकारण, आप-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप

दिल्लीतील हवेच्या प्रदूषणावरून राजकारण सुरू असताना आता त्यात दिल्लीतील दूषित पाण्याचीही भर पडली आहे. केजरीवाल सरकार मोफत पाण्याच्या नावाखाली दिल्लीकरांना विष पाजत आहे असा आरोप करत केंद्रातील भाजप सरकारने आप सरकारला चांगलेच घेरले, मात्र भाजप अशुद्ध पाण्याचे उगाच राजकारण करत आहे. दिल्लीचे पाणी शुद्ध असून केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी स्वतः पाण्याचे नमुने तपासावेत, असे आव्हान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपला दिले.

भाजप अपप्रचार करत आहे!

केंद्र सरकारने देशातील 21 महानगरांमधील पाण्याच्या शुद्धतेबाबत दिलेल्या अहवालात दिल्लीचे पाणी सर्वात प्रदूषित आढळले. ‘दिल्लीच्या पाण्यावरून केंद्रातले भाजप सरकार राजकारण करत आहे. देशातील 11 ठिकाणच्या नमुन्यांवर दिल्लीच्या पाण्याचा दर्जा कसा काय ठरवू शकतात, हे पाण्याचे नमुने त्यांनी कुठे गोळा केले आहेत? दिल्ली जल विभागाने दिलेल्या अहवालात पाण्याचे नमुने 2 टक्क्यांहून कमी अशुद्ध होते. रामविलास पासवान यांनी स्वतः येऊन नमुने तपासावेत आणि पाण्याच्या शुद्धतेची खात्री करावी. केंद्रातील भाजप सरकार पाण्यावरून दिल्ली सरकारविरोधात अपप्रचार करत आहे’ असे केजरीवाल म्हणाले. दरम्यान, दिल्लीतील काही भागांत भाजपने आपच्या दिल्ली सरकारविरोधात ‘मोफत पाण्याआडून दिल्ली सरकार लोकांना विष पाजत आहे’ अशी पोस्टरबाजी केली.

केजरीवाल यांनी प्रदूषण रोखण्यासाठी काय केले? -गंभीर

दिल्लीच्या प्रदूषणावरून भाजपचे खासदार गौतम गंभीर यांना ‘आप’ने चांगलेच घेरले. प्रदूषणावरील बैठकीला अनुपस्थित राहण्यावरून ‘आप’ने गंभीर बेपत्ता असल्याची पोस्टर दिल्लीत लावली होती. त्यामुळे भडकलेल्या गंभीरने आप खालच्या स्तरावर राजकारण करत असल्याची टीका केली. ‘दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी प्रदूषण रोखण्यासाठी काय केले ते आधी सांगावे. क्रिकेट समालोचक म्हणून मी अनेक महिन्यांपूर्वी करार केला होता. त्यामुळे मी ग्वाल्हेरला गेलो होता. राहिला जिलेबीचा प्रश्न. जर जिलेबी खाण्यामुळे प्रदूषण संपत असेल तर मी कायमचा जिलेबी सोडायला तयार आहे’ असे गंभीर म्हणाला.

दिल्लीची हवा सुधारतेय; सम-विषम वाहतूक नियम मागे

दिल्लीतील वाढत्या हवेच्या प्रदूषणामुळे 4 नोव्हेंबरपासून लागू करण्यात आलेल्या सम-विषम वाहतूक नियमाची आता गरज नाही असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले. आकाश स्वच्छ आहे आणि आता या नियमाची आवश्यकता नाही असे केजरीवाल म्हणाले. दिवाळीतील फटाके तसेच पंजाब-हरयाणामध्ये शेतीच्या कामानंतर उरलेले तणयुक्त गवत जाळल्यामुळे दिल्लीला प्रदूषणाने विळखा घातलेला होता, मात्र रस्त्यावर सम-विषम नंबरनुसार गाडय़ा धावतील असा निर्णय दिल्ली सरकारने घेतल्यानंतर हवेचा दर्जा सुधारायला मदत झाली आहे. सम-विषम गाडय़ांच्या नियमांचे उल्लंघन करणाऱया 5 हजार जणांकडून  आतापर्यंत प्रत्येकी 4 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या