दिल्लीतील महिलेने आपली इमारत राहुल गांधींच्या नावे केली

काँग्रेस नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. खासदारकी रद्द करण्यात आल्याने राहुल गांधी यांना सरकारी निवासस्थान रिकामे करण्यास सांगण्यात आले आहे. यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी माझे घर राहुल गांधींचे घर अशी मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम राबवली जात असताना दिल्लीच्या रहिवासी असलेल्या राजकुमारी गुप्ता यांनी त्यांची मंगोलपुरी येथील 4 मजली इमारतच राहुल गांधी यांच्या नावे केली आहे.

सूरतमधील न्यायालयाने राहुल गांधी यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांचे लोकसभेचे सदस्यत्व तत्काळ काढून घेण्यात आले होते. यानंतर राहुल गांधी यांचा 12 तुघलक लेन येथील सरकारी निवासस्थान 22 एप्रिलपर्यंत रिकामे करण्याचे आदेश देण्यात आले आहे. खासदारांच्या निवासस्थानांबाबत निर्णय घेणाऱ्या लोकसभेच्या समितीने राहुल गांधी यांना हे घर रिकामे करण्यासाठीची नोटीस दिली आहे. या नोटीसमध्ये म्हटलंय की खासदारकी रद्द झाल्याने ते सरकारी निवासस्थानात जास्तीत जास्त 1 महिना म्हणजेच 22 एप्रिलपर्यंत राहू शकतात.

खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी अधिक आक्रमक

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांचे घनिष्ठ संबंध आहेत. अदानींच्या शेल (बोगस) कंपन्यांमध्ये 20 हजार कोटींची गुंतवणूक कोणी केली? हे पैसे कोणाचे आहेत? हा पैसा कोठून आला? अशी प्रश्नांची सरबत्ती करीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जोरदार हल्लाबोल केला. आपले पितळ उघडे पडेल याची भीती पंतप्रधान मोदींना आणि भाजपला वाटते. त्यामुळेच माझी खासदारकी रद्द केली. मात्र, आयुष्यभरासाठी खासदारकी रद्द केली किंवा धमक्या दिल्या तरी मी घाबरणार नाही, माफी मागणार नाही, गुडघे टेकणार नाही. मी प्रश्न विचारणारच, असा निर्धारही राहुल गांधींनी व्यक्त केला.

खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली होती. संसदेत विचारलेले प्रश्न, मोदी-अदानी यांचे संबंध आणि लोकसभा सचिवालयाकडून झालेली अपात्रतेची कारवाई या सगळय़ाचे बिंदू जोडून राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदी आणि भाजपवर हल्ला चढविला. आपल्याविरुद्ध कसे षडयंत्र रचले जात आहे. मोदी सरकार आणि भाजपकडून अदानी प्रकरण या मूळ मुद्दय़ावरून दुसरीकडे लक्ष कसे वळविण्याचा प्रयत्न होतो आहे, हे राहुल गांधी यांनी सांगितले.

विरोधी पक्षांचे आभार; सर्व एकत्र काम करतील
माझ्या भूमिकेला विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला. त्याबद्दल सर्वांचे आभार. पुढील काळात विरोधक एकत्र काम करतील, असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला. मोदी सरकार ‘पॅनिक मोड’वर गेले हे सत्य आहे. खासदारकी रद्द करून मोदी सरकारने विरोधी पक्षांच्या हातात सर्वात मोठे हत्यार दिले आहे. कारण पंतप्रधान मोदी हे भ्रष्ट व्यक्तीला (अदानी) का वाचवत आहेत? हा प्रश्न जनता विचारत आहे.