रोहित शेखरचा बायकोनेच गळा आवळून खून केला, अपूर्वा शेखरला अटक

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

उत्तराखंड व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री दिवंगत नारायण दत्त तिवारी यांचा मुलगा रोहित शेखर याच्या हत्येप्रकरणी त्याची पत्नी ‘अपूर्वा शुक्ला’ला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. तपासादरम्यान मिळालेल्या पुराव्याच्या आधारावर अपूर्वाला अटक करण्यात आली आहे. रोहितचा मृत्यू झाला त्या दिवशी सोमवारी रात्री पती पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. भांडणाचे रुपांतर हाणामारीत झाले .यावेळी रागाच्या भरात दोघांनी एकमेकांचा गळा आवळला. यात रोहितचा मृत्यू झाल्याची कबुली अपू्र्वाने दिली आहे.

दरम्यान,  झोपेत रोहितचा मृत्यू झाला असावा असो थातूरमातूर उत्तर अपूर्वाने यापूर्वी झालेल्या पोलीस चौकशीत दिले होते. पण अपूर्वाच्या जबाबावर पोलिसांना संशय आला. ती स्वत: सर्वोच्च न्यायालयात मोठ्या पदावर कार्यरत असल्याने कायद्याच्या कचाट्यातून निसटण्याच्या सर्व कलमांची तिला माहिती होती. ती आपली दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचा पोलिसांना दाट संशय होता. रोहीतचा मृत्यू ठरवून नाही तर स्वत:चा बचाव करताना झाल्याचे दाखवण्याचा ती प्रयत्न करेल असेही पोलिसांना वाटत होते. यामुळे पोलिसांनी सगळे पुरावे गोळा केल्यानंतर अपूर्वाला अटक करण्याचा निर्णय घेतला.

अपूर्वाच्या कॉल डिटेल रेकॉर्डवरून पोलिसांना तिच्यावर संशय आला होता. मंगळवारी सकाळी  11 च्या सुमारास तिने मोबाईलवरून दिल्लीबाहेर राहणाऱ्या एका व्यक्तीस फोन केला होता. हा फोन तिने कुणाचा तरी सल्ला घेण्यासाठी केला असावा असा संशय पोलिसांना होता. तिचा जबाबही सतत बदलत होता. यामुळे पोलिसांच्या तपासाची सुई अपूर्वा भोवतीच फिरत होती. रोहितची हत्या झाली त्या दिवशी घडलेल्या घटनांबद्दल पोलिसांना सांगताना तिने 3 वेळा आपला जबाब बदलला होता. हाय प्रोफाईल प्रकरण असल्याने पोलिसांवरही दडपण होते. पण रोहीतची आई उज्वला शर्मा यांनी रोहित व अपूर्वाचे पटत नव्हते, ते जूनमध्ये घटस्फोट घेणार असल्याचे पोलिसांना सांगितले.

आईने दिलेल्या माहितीमुळे रोहित हत्याप्रकरणाला वेगळे वळण मिळाले. चौकशीसाठी पोलिसांनी अपूर्वाला व घरातील दोन नोकरांना ताब्यात घेतले. तसेच इतर चारजणांचीही चौकशी सुरू होती. पोलिसांच्या प्रश्नांच्या सरबत्तीमुळे अपूर्वा हादरली व तिने रोहितची हत्या केल्याची कबुली देत हत्येच्या दिवशीचा सगळा घटनाक्रम पोलिसांना सांगितला.

सोमवारी 11 एप्रिल रोजी रात्री रोहीत घरातच एका मैत्रिणीबरोबर दारू पीत होता. अपूर्वाने हे बघितले. आधीच माहेरच्यांसाठी वेगळे घर घेऊन देण्याच्या मुद्दयावरून दोघात वाद सुरू होता. अपूर्वाला माहेरच्यांना वेगळे घर घेऊन द्यायचे होते. त्यासाठी ती रोहितच्या मागे लागली होती मात्र याला रोहितचा विरोध होता. यावरून दोघांमद्ये सतत वाद होत असतं. सोमवारीही त्यांच्यात वाद झाला. दोघांनी एकमेकांना मारहाण केली. तसेच एकमेकांचा गळाही आवळला . पण रोहीत दारूमुळे झिंगला असल्याने अपूर्वाला विरोध करण्यात कमी पडला व अपूर्वाने त्याचा गळा आवळून त्याला ठार केले. रोहितला ठार मारल्यानंतर पुरावा मागे सुटू नये यासाठी तिने स्वत:चा मोबाईलमधला सगळा तपशील डिलीट केला होता.