सत्येंद्र जैन यांना दिलासा, 360 दिवसांनंतर 42 दिवसांचा जामीन

आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र जैन यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. कोर्टाने मेडिकल अहवालाच्या आधारावर 42 दिवसांसाठी जामीन मंजूर केला आहे. सत्येंद्र जैन यांना ईडीने 30 मे 2022 रोजी अटक केली होती.

सत्येंद्र जैन गुरुवारी तिहार जेलमधील बाथरूममध्ये चक्कर येऊन पडले होते. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले. जैन यांची प्रकृती खालावल्याची बातमी समोर आल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केले. ‘जी व्यक्ती रात्रंदिवस चांगले उपचार आणि जनतेला चांगले आरोग्य देण्यासाठी झटत होती, आज त्या चांगल्या व्यक्तीला हुकूमशहाने त्रास दिला आहे. त्या हुकूमशहाचा एकच विचार असतो – प्रत्येकाला संपवायचे, तो फक्त ‘मी’मध्ये राहतो. त्याला फक्त स्वतःला बघायचे आहे. देव सर्व पाहत आहे. तो सर्वांना न्याय देईल. सत्येंद्रजी लवकर बरे व्हावेत यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो. ईश्वर त्यांना या प्रतिकूल परिस्थितीशी लढण्याचे बळ देवो, असे ट्विट केजरीवाल यांनी केले.

सत्येंद्र जैन गेल्या 1 वर्षापासून तुरुंगात आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाने नुकताच त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात जैन यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान जैन यांच्या वकिलांनी सांगितले की, सत्येंद्र जैन यांना आरोग्याच्या गंभीर समस्या आहेत. त्यांचे वजन 35 किलोने कमी झाले आहे. यानंतर कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला.