सहा महिन्यांत सरकारी बँकांमध्ये 95700 कोटींचे घोटाळे!

590

चालू आर्थिक वर्षांत 2019-20च्या पहिल्या सहा महिन्यांत सरकारी बँकांमध्ये तब्बल 95700 कोटींचे घोटाळे झाले आहे. याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी राज्यसभेत गुरुवारी माहिती दिली. दरम्यान, देशात बँक घोटाळ्यांचे सत्र सुरूच असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.

बँक घोटाळ्यासंदर्भात विचारलेल्या लेखी उत्तरात अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी रिझर्व्ह बँकेच्या अहवालाचा हवाला दिला. 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2019 या सहा महिन्यांत बँक घोटाळ्याचे 5743 प्रकरणे उघडकीस आली. घोटाळ्याची रक्कम 95760.49 कोटी रुपये इतकी आहे. हे सर्व घोटाळे केंद्र सरकारचे नियंत्रण असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील आहेत.

3.38 बँक खाते गोठविले

बँक घोटाळे रोखण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे. 3.38 लाख खाते गोठविले आहेत. हे खाते ऑपरेट केली जात नव्हती, असेही सितारामण यांनी सांगितले.

‘पीएमसी’ बँकेतील 78 टक्के गुंतवणूकदारांना पूर्ण पैसे परत मिळाले

पंजाब ऍण्ड महाराष्ट्र बँकेतील (पीएमसी) घोटाळ्यासंदर्भातील प्रश्नावर अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी उत्तर दिले. ग्राहकांना 50 हजार रुपयांपर्यंत पैसे काढण्याची मुभा दिली आहे. यामुळे ‘पीएमसी’ बँकेच्या 78 टक्के गुंतवणूकदारांना आपले पूर्ण पैसे परत मिळाले आहेत, असे ठाकूर म्हणाले. ‘पीएमसी’ बँकेत सप्टेंबर 2019 पर्यंत 915775 खातेदार आहेत. रिझर्व्ह बँकेने मार्च 2019 मध्ये केलेल्या तपासानुसार हौसिंग डेव्हलपमेंट ऍण्ड इफ्रास्ट्रक्चर लिमिटेडकडून (एचडीआयएल) कर्जाची परतफेड न झालेली रक्कम 6226 कोटी रुपये असल्याची माहिती ठाकूर यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या