दिल्लीत दोन वृद्ध कोरोना रुग्णांना दिली अँटीबॉडी कॉकटेल, आठ दिवसात कोरोनामुक्त

कोरोना उपचारांमध्ये अँटीबॉडी कॉकटेल उपयोग अतिशय प्रभावी असल्याचे समोर येत आहे. दिल्लीत एका खासगी रुग्णालयात दोन वयोवृद्ध रुग्णांना ही औषध देण्यात आले होते. तेव्हा दोन्ही रुग्ण अवघ्या आठ दिवसांत कोरोनामुक्त होऊन ठणठणीत बरे झाले.

दिल्लीतील काही खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांना मोनोक्लोनल अँटीबॉडी देण्याचा प्रयोग सुरू करण्यात आला होता. या उपचारांत कासिरीविमॅब आणि इमडेविमॅब या दोन औषधांचा वापर होतो. या औषधाला अँटीबॉडी कॉकटेल म्हटले जाते. हिंदुस्थान रॉश कंपनीने हे औषध लॉन्च केले असून सिप्ला या औषधाचे वितरण करत आहे.

बीएल कपूर मॅक्स सुपर स्पेशालिटी रुग्णालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार ६५ वर्षीय सुरेश कुमार त्रेहन आणि ७० वर्षीय सुनिर्मल घटक या दोन रुग्णांना अँटीबॉडी कॉकटेल देण्यात आले होते. दोघांचा जेव्हा कोरोना रीपोर्ट पॉझिटिव्ह आला तेव्हा तीन दिवसानंतर त्यांना अँटीबॉडी कॉकटेल देण्यात आले होते. कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतर आठ दिवसांनंतर जेव्हा दोन्ही रुग्णांची कोरोना टेस्ट करण्यात आली तेव्हा दोघांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली.

स्विर्त्झलँडची औषध कंपनी रॉशने अँटीबॉडी कॉकटेल लॉन्च केले आहे. हिंदुस्थानात सिप्ला कंपनी या अँटीबॉडी कॉकटेलचे वितरण करत आहे. एका अँटीबॉडी कॉकटेलची किंमत 59 हजार 750 रुपये इतकी आहे. अँटीबॉडी कॉकटेल हे दोन औषधांचे मिश्रण आहे. त्यात कासिरीविमॅब आणि इमडेविमॅब या दोन प्रमुख औषधांचा समावेश आहे. दोन्ही औषधांची प्रत्येकी 600 मिलिग्राम मात्रा वापरून अँटीबॉडी कॉकटेल तयार केले जाते. हे कॉकटेल विषाणू मनुष्याच्या कोशिकात जाण्यास रोखतं, त्यामुळे विषाणूला प्रथिनं मिळत नाही आणि शरीरात पसरत नाही.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जेव्हा कोरोनाची लागण झाली होती तेव्हा त्यांना हेच अँटीबॉडी कॉकटेल देण्यात आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या