… तर मोदी एक दिवस ‘ताजमहल’ही विकतील, राहुल गांधींचा हल्लाबोल

870

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून मंगळवारी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी प्रचाराच्या मैदानात उडी घेतली. राहुल गांधी यांनी आपल्या पहिल्याच सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर हल्ला चढवला. केंद्र सरकारने सर्व काही विकण्याचा सपाटा लावला असून एक दिवस ते ताजमहलही विकतील असा चिमटा राहुल गांधींनी काढला आहे.

दिल्लीतील जंगपुरा येथे राहुल गांधी यांची सभा पार पडली. या सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, आजकाल भारतीय जनता पक्षाचे लोकं देशभक्तीच्या गोष्टी करत आहेत. सकाळ-संध्याकाळ पाकिस्तान-पाकिस्तान ओरडत असता. तुम्ही मला भाजपच्या अशा एका तरी नेत्याचे नाव सांगा ज्याच्यामध्ये पाकिस्तानमध्ये जाऊन हिंदुस्थान झिंदाबादच्या घोषणा देण्याचा दम आहे.

यावेळी राहुल गांधी यांनी भाजपसह आम आदमी पक्षावरही हल्लाबोल केला. काम काही होत नाही फक्त मार्केटिंग सुरू असल्याचे ते म्हणाले. मोदींनी प्रत्येक वर्षी 2 कोटी तरुणांना नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते… मिळाल्या का? असा सवाल करत राहुल गांधींनी केजरीवाल यांचीही पिसे काढली. केजरीवाल यांनीही नोकरीचे आश्वासन दिले, मात्र पूर्ण केले नाही असे ते म्हणाले.

मोदी सरकारवर हल्लाबोल करताना राहुल गांधी म्हणाले की, इंडियन ऑईल, एअर इंडिया, हिंदुस्तान पेट्रोलियम, रेल्वे, एनर्जी, लाल किल्लाही विकून टाकला. आता एखाद्या दिवशी ताजमहलही विकतील. भाजपने सर्वच विक्रीला काढले आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या