महाराष्ट्रात शाळा बंद करणारे दिल्लीत प्रचाराला, केजरीवालांचा तावडेंना खोचक टोला

1066

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून भाजपने विजयासाठी जोर लावला आहे. प्रचारासाठी केंद्रीय मंत्र्यांसह महाराष्ट्रातील नेत्यांनीही दिल्लीत तळ ठोकला आहे. महाराष्ट्र भाजपचे नेते दिल्लीत प्रचार करताना दिसत आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह माजी मंत्री विनोद तावडे हे देखील प्रचाराच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांचे काही फोटोही व्हायरल झाले असून यावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विनोद तावडे यांनी तोलाही लगावला आहे.

निवडणूक आयोगाची भाजपला चपराक, प्रचारकांच्या यादीतून दोघांची नावे हटवण्याचे आदेश

विनोद तावडे यांचा प्रचार करतानाचे फोटो ट्वीट करत अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. महाराष्ट्रामध्ये 1300 सरकारी शाळा बंद करणारे शिक्षणमंत्री विनोद तावडे हे दिल्लीत भाजपचा प्रचार करत आहेत. त्यांना दिल्लीतील शाळा दाखवा, छोले-भटुरे खाऊ घाला आणि दिल्ली दर्शन घडवा. ते आपले पाहुणे आहेत, असा खोचक टोला केजरीवाल यांनी विनोद तावडे यांनी लगावला आहे.

21 वर्षांचा वनवास संपणार की पुन्हा…
दिल्लीमध्ये गेल्या दोन दशकांपासून भाजप सत्तेपासून वंचित आहे. 2020 ची विधानसभा निवडणूकही सोपी नसून नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनसीआरवरून दिल्ली रान उठले आहे. तसेच आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत चांगले काम केल्याची भावना लोकांमध्ये आहे. तसेच केजरीवाल सरकारच पुन्हा सत्तेवर येईल असा अंदाज एबीपी न्यूज-सी वोटरने व्यक्त केल्यामुळे दिल्लीत 21 वर्षानंतर भाजपचा वनवास संपणार की पुन्हा विजय हुलकावणी देणार हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

भाजपची प्रतिष्ठा पणाला
दिल्लीमध्ये 70 जागांसाठी 8 फेब्रुवारी 2020 रोजी एकाच टप्प्यात निवडणूक घेण्यात येणार असून 11 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपने केंद्रीय मंत्री, भाजपची सत्ता असणाऱ्या राज्यातील मंत्र्यांची फौजी उभी केली आहे. त्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या