सीएए, एनआरसीविरोधात दिल्लीत पुन्हा भडका; कॉन्स्टेबलसह चार ठार, डीसीपीसह 37 पोलीस गंभीर जखमी

538

सीएए, एनआरसीविरोधात सलग दुसऱया दिवशी दिल्लीत जनक्षोभाचा भडका उडाला. सीएए समर्थक आणि विरोधकांमध्ये झालेल्या दगडफेक आणि गोळीबारात पोलीस हेडकॉन्स्टेबल रतन लाल यांचा मृत्यू झाला. तसेच तीन नागरिक ठार झाले असून शहादराचे डीसीपी अमित शर्मा यांच्यासह 37 पोलीस गंभीर जखमी झाले. संतप्त जमावाने पेट्रोल पंप, पोलीस व्हॅनसह अनेक गाडय़ा जाळल्या. पोलिसांनी 10 भागांमध्ये जमावबंदी लागू केली आहे. परिसरातील शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली असून बोर्ड परीक्षा स्थगित केल्या आहेत.

रविवारी जाफराबाद आणि चांदबागमध्ये सीएएविरोधी आंदोलनाला हिंसक वळण लागले. सोमवारी पुन्हा सीएए समर्थक आणि विरोधक समोरासमोर भिडल्याने वातावरण कमालीचे हिंसक बनले. जाफराबाद, मौजपूर, भजनपुरा, कर्दमपुरी, चांदबाग, यमुना विहार आणि दयालपूर परिसरात तुफान दगडफेक झाली. यात पोलीस हेडकॉन्स्टेबलला प्राण गमवावा लागला. संतप्त जमावाने काही गाडय़ा जाळल्या असून घरे-दुकानांसह गोदामे आणि पेट्रोलपंपांनाही आगी लावल्या.  परिसरात मोठय़ा प्रमाणावर पोलीस तसेच निमलष्करी दलाचे जवान तैनात आहेत. दिल्लीतील तणाव कायम असल्यामुळे डीएमआरसीने मौजपूर आणि बाबरपूर मेट्रो स्टेशन बंद ठेवले आहे. दरम्यान, आम्ही दोन्ही गटांशी चर्चा केली असून आता परिस्थिती नियंत्रणात आहे. हिंसाचारात काही लोक जखमी झाले असून सर्वांना शांततेचे तसेच अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे अशी माहिती डीसीपी (नॉर्थ-ईस्ट दिल्ली) वेद प्रकाश सूर्य यांनी दिली.

मुख्यमंत्री केजरीवाल यांची केंद्रीय गृहमंत्री, नायब राज्यपालांशी चर्चा

राजधानी दिल्लीतील दगडफेक आणि जाळपोळीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नायब राज्यपाल अनिल बैजल आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी कायदा व सुव्यवस्थेबाबत चर्चा केली. उपराज्यपाल बैजल यांनी सर्वांना शांतता आणि सद्भाव कायम राखण्याचे आवाहन केले आहे.

ट्रम्प यांचा दौरा डोळ्यासमोर ठेवून हिंसा घडवल्याचा संशय

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे हिंदुस्थान दौऱयावर आहेत. त्यांचा दौरा डोळ्यासमोर ठेवूनच राजधानीत जाणूनबुजून हिंसाचार घडवून आणला गेला आहे. देशाची प्रतिमा मलीन करण्याचे हे षड्यंत्र आहे, असा संशय गृह मंत्रालयाने वर्तवला आहे. मी या घटनेचा तीक्र निषेध करतो. केंद्र सरकार अशाप्रकारचा हिंसाचार कदापि खपवून घेणार नाही. जबाबदार लोकांविरोधात सरकार कठोर कारवाई करेल, असे केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी स्पष्ट केले.

मध्यस्थांनी सादर केला शाहीन बागेचा अहवाल

शाहीन बागेतील आंदोलनाबाबत सर्वोच्च न्यायालयात सोमवारीही निर्णय झाला नाही. न्यायालयाने नेमलेल्या तिघा मध्यस्थांनी आपला सीलबंद अहवाल न्यायालयापुढे सादर केला, मात्र या अहवालाचा अभ्यास करून नंतरच निर्णय दिला जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट करीत या प्रकरणाची सुनावणी बुधवारपर्यंत तहकूब केली.

आपली प्रतिक्रिया द्या