Delhi Violence – दिल्ली पोलिसांवर ताशेरे ओढणाऱ्या न्यायमूर्तींची बदली

1476
justice-murlidhar

Delhi Violence गेल्या महिन्यापासून राजधानी दिल्लीत CAA वरून केंद्र सरकारविरोधात आंदोलन सुरू आहे. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हिंदुस्थान दौऱ्या दरम्यान दिल्लीतील आंदोलनालनाने हिंसाचाराचे वळण घेतले. CAA समर्थक आणि विरोधकांमध्ये झालेली चिथावणीखोर विधाने, त्यानंतर झालेला हिंसाचार यामुळे दिल्लीत कायदा सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली. याच पार्श्वभूमीवर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीवेळी न्यायमूर्तींनी दिल्ली पोलिसांना चपराक लगावली. दिल्ली पोलिसांच्या भूमिकेवर ताशेरे ओढणाऱ्या न्या. एस मुरलीधर (justice muralidhar) यांची बुधवारी रात्रीच पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात बदली करण्यात आली. बुधवारी झालेल्या सुनावणीला गुरुवार पर्यंत स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर हे प्रकरण मुख्य न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील पीठाकडे वर्ग करण्यात आले होते.

बुधवारी झालेल्या सुनावणीनंतर रात्री उशिरा न्या. एस मुरलीधर यांच्या बदलीची अधिसूचना राष्ट्रपती भवनातून जारी करण्यात आली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हिंदुस्थानचे मुख्यन्यायाधीश एसए बोबडे यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर न्या. एस मुरलीधर यांची दिल्ली उच्च न्यायालयातून पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात बदली करण्यात येत असल्याची अधिसूचना जारी केली. तसेच त्यांना पदभार सांभळण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने 12 फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत दिल्ली उच्च न्यायालयाचे न्या. एस मुरलीधर यांना पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात बदली करण्याची शिफारस केली होती.

उच्च न्यायालयाने पोलिसांवर केली होती टीका

दिल्ली उच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान कडक शब्दात पोलिसांवर टीका केली होती. दिल्लीत दुसरे 1984 होऊ देणार नाही, असे न्यायालयाने म्हटले होते. दिल्ली पोलिसांना ताशेरे लगावतानाच भाजप नेत्यांचे चिथावणीखोर व्हिडीओ देखील पाहण्यात आले होते.

1984 च्या दंगलीतील पीडितांच्या नुकसान भरपाईची प्रकरणं आता सोडवली जात आहेत, असे परत होता कामा नये. लोकांना मदत मिळाली पाहिजे. अशा स्थितीत हे अत्यंत कठीण काम आहे, मात्र नम्र शब्दात संवाद सुरू राहिला पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले होते.

आपली प्रतिक्रिया द्या