दिल्ली हिंसाचाराला अमित शहा जबाबदार! सोनिया गांधीनी केली राजीनाम्याची मागणी

1236

दिल्लीत भडकलेल्या हिंसाचाराबद्दल काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी चिंता व्यक्त केली आहे. या हिंसाचाराला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. सोनिया यांनी या हिंसाचारासाठी शहा यांना जबाबदार धरतानाच त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. केंद्रीय गृहमंत्री, दिल्लीचे मुख्यमंत्री रविवारपासून काय करत होते असा सवालही त्यांनी विचारला.दिल्लीतील हिंसाचार हे सुनियोजित षडयंत्र होते असा आरोपही सोनिया गांधी यांनी केला आहे.

दिल्लीतील हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी काँग्रेस एक मोर्चा काढणार असून काँग्रेसतर्फे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदनही सोपवणार आहे. राष्ट्रपतींनी विरोधकांना गुरुवारची वेळ दिली असून हा मोर्चा गुरुवारी काढला जाणार आहे. सोनिया गांधी यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना हिंसाचाराने पोळलेल्या भागांना भेट देऊन तिथल्या लोकांना शक्य ती मदत करण्यास सांगितले आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची गरज होती, मात्र तसं झालं नाही. केंद्रीय गृहमंत्र्यांनी बैठक बोलावली होती मात्र त्या बैठकीला अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले होते. सर्वपक्षांच्या नेत्यांची बैठक झाली नसल्याचं सोनिया गांधी यांनी म्हटले.

आपली प्रतिक्रिया द्या