Delhi Violence – मृतांचा आकडा 13 वर, मंगळवारी आणखी आठ जणांचा मृत्यू

1163

नागरिकता सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणी (एनआरसी) विरोधात राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलन हिंसक झाले. सोमवारी हिंसाचारामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला होता. मंगळवारी हा आकडा वाढून 13 वर पोहोचला आहे. दिल्लीतील जीटीबी रुग्णालयातील डॉक्टर सुनील कुमार यांनी मंगळवारी आणखी आठ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. दिल्ली पोलिसांनी सायंकाळी पत्रकार परिषद घेत याला दुजोरा दिला आहे.

हिंसाचार पसरवणाऱ्य़ांवर नजर ठेवा, गृहमंत्री अमित शहांचे निर्देश

ईशान्य दिल्लीमध्ये भडकलेल्या हिंसाचारामध्ये आतापर्यंत हेड कॉन्स्टेबल रतन लाल यांच्यासह 13 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 130 सामान्य नागरिक आणि 56 पोलीसही जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.

हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून अनेक भागांमध्ये मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. चिंचोळ्या गल्ली-बोळांमुळे पोलिसांच्या कारवाईमुळे अडथळा आल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले. तसेच काही लोकांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून अफवा पसरवू नका आणि अफवांवर विश्वास ठेऊ नका असे आवाहनही दिल्ली पोलिसांनी केले आहे. हिंसाचारग्रस्त आणि तणावग्रस्त भागामध्ये पोलिसांचा प्लॅग मार्च काढण्यात येईल. काही भागांमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे, असे देखील दिल्ली पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

दिल्ली पोलीस सशक्त
राजधानीतील हायप्रोफाईल भागामध्ये हिंसाचार भडकल्याने दिल्ली पोलिसांना सोशल मीडियाद्वारे ट्रोल करण्यात येत आहे. यावर दिल्ली पोलिसांनी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिले आहे. दिल्ली पोलीस सशक्त आहेत. ईशान्य दिल्लीमध्ये आवश्यक फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सीआरपीएफ, आरएएफ आणि दिल्ली पोलिसांच्या अतिरिक्त तुकड्याही सक्रिय आहेत. तसेच आतापर्यंत 11 एफआयआर दाखल करण्यात आल्या असून काहींना अटक करण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.

रतनलाल यांना अखेरची सलामी
दिल्लीमध्ये सोमवारी उफळलेल्या हिंसाचारामध्ये हेड कॉन्स्टेबल रतन लाल यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांच्यावर मंगळवारी शासकीय इतमामानत अंत्यसंस्कार करण्यात आले. दिल्लीचे पोलीस आयुक्त अमूल पटनायक आणि उपराज्यपाल अनिल बैजल यांनी शहीद रतन लाल यांना श्रद्धांजली वाहिली. रतन लाल यांनी देशासाठी बलिदान दिले आहे. आम्हाला त्यांच्यावर गर्व आहे असे म्हणत पोलीस आयुक्त अमूल्य पटनायक यांनी रतन लाल यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

आपली प्रतिक्रिया द्या