Delhi Violence – हिंसाचार करणाऱ्यांना दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश

2335

दिल्लीमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याविरुद्ध उफळलेल्या हिंसाचारामध्ये आतापर्यंत 10 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील हिंसाचार थांबण्याचे नाव नसून मंगळवारीही अनेक भागांमध्ये हिंसाचार उफळला. यानंतर हिंसाचार रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी मोठे पाऊल उचलले असून ईशान्य दिल्लीमध्ये हिंसाचार करणाऱ्यांना दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत. ‘आज तक‘ या वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे.

ईशान्य दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला असून आंदोलकांनी जाळपोळ. दगडफेक करत हैदोस घातला आहे. वातावरण तणावाचे राहिल्याने या भागात एक महिन्यासाठी कलम 144 लागू करण्यात आले. तसेच चार ठिकाणी कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. दरम्यान, दिल्लीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आयपीएस एस.एन. श्रीवास्तव यांची विशेष पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

दिल्ली पोलिसांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत दिल्लीतील परिस्थितीची माहिती दिली. ईशान्य दिल्लीमध्ये भडकलेल्या हिंसाचारामध्ये आतापर्यंत हेड कॉन्स्टेबल रतन लाल यांच्यासह 10 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 130 सामान्य नागरिक आणि 56 पोलीसही जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.

सीबीएसई परीक्षा रद्द करण्याची मागणी
दिल्लीमध्ये ईशान्य दिल्ली, जाफराबाद भागामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. यानंतर आप नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी बुधवारी दिल्लीतील शाळा बंद राहतील अशी माहिती दिली. तसेच सीबीएसईने उद्या होणाऱ्या सर्व परीक्षा रद्द करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

आपली प्रतिक्रिया द्या