42 ठार, 123 गुन्हे, 630 ताब्यात; दिल्लीतील आगडोंब थंडावला, दहशत मात्र कायम

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात (सीएए) हिंसाचाराचा भडका उडालेल्या राजधानी दिल्लीतील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. हिंसाचाराचा आगडोंब थंडावला आहे, मात्र बळींचा आकडा वाढतच असून शुक्रवारी तो 42 वर पोहोचल्याने दहशतीचे सावट कायम आहे. दिल्ली पोलिसांनी हिंसाचारप्रकरणी 123 गुन्हे दाखल करून 630 संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यातील अनेकांना अटक केली आहे.

हिंसाचारग्रस्त भागांतील अनेक दुकाने उघडली असून रिक्षा व इतर खासगी वाहने रस्त्यावर धावू लागली आहेत. काही नागरिक धाडस करून घराबाहेर पडले, तर पालिका कामगार विटा आणि काचांचा खच बाजूला करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. यावरून जनजीवन पूर्वपदावर येत असल्याचेच दिसून येते, असे दिल्ली पोलीस सहआयुक्त ओ. पी. मिश्रा यांनी सांगितले. पोलिसांनी संशयितांची धरपकड सुरू ठेवत आतापर्यंत 630 लोकांना ताब्यात घेतले आहे. न्यायवैद्यक प्रयोगशाळेची पथके हिंसाचार घडलेल्या भागांत दाखल झाली असून त्यांच्या सहाय्याने पुढील तपास केला जात आहे, अशी माहिती दिल्ली पोलिस प्रवक्ते मनदीप सिंग यांनी दिली.

हिंसाचारग्रस्तांच्या मदतीला धावले केजरीवाल सरकार

दिल्लीतील केजरीवाल सरकारने हिंसाचारग्रस्तांना आर्थिक मदतीचा हात दिला आहे. हिंसाचारात घरे जळालेल्या नागरिकांना प्रत्येकी 25 हजारांची नुकसानभरपाई दिली जाईल. शनिवारपासूनच या मदतीची रोख रक्कम नागरिकांना दिली जाईल, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी जाहीर केले. हिंसाचारात बेघर झालेल्या नागरिकांची स्थानिक सामुदायिक केंद्रांमध्ये राहण्याची तसेच भोजनाची व्यवस्था केली आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या पथकाची जाफराबादमध्ये भेट

हिंसाचाराने अनेक महिलांनाही प्रचंड यातना दिल्या. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महिला आयोगाच्या पथकाने शुक्रवारी जाफराबादमध्ये भेट दिली. पथकामध्ये अध्यक्षा रेखा शर्मा यांच्यासह अन्य दोन अधिकारी होते. येथील परिस्थिती शांततेची, मात्र तणावपूर्ण आहे. आम्ही आज काही मोजक्याच महिलांची भेट घेऊ शकलो. उद्या पुन्हा भेट देणार असल्याचे अध्यक्षा शर्मा यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

निमलष्करी दल, पोलिसांच्या सुरक्षेत शुक्रवारचा नमाज

शुक्रवारी नमाजाच्या पार्श्वभूमीवर निमलष्करी दलाच्या जवळपास 7 हजार जवान आणि शेकडो पोलिसांनी परिसरात जागता पहारा दिला. हिंसाग्रस्त भागातील कलम 144 चार तासांसाठी शिथिल केले होते. भडकावू मेसेज आणि अफवा रोखण्यासाठी पोलीस विशेष खबरदारी घेत असून नियमित फ्लॅग मार्च काढण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांत हिंसाग्रस्त भागांत 331 शांतता बैठका घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, स्थानिक मशिदींच्या वतीनेही नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले.

भडकावू भाषणप्रकरणी हायकोर्टाची केंद्राला नोटीस

भडकावू भाषण दिल्याप्रकरणी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी-वढेरा यांच्याविरोधात गुन्हे दाखल करा, अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. मुख्य न्यायमूर्ती डी. एन. पटेल आणि न्यायमूर्ती सी. हरी शंकर यांच्या खंडपीठाने याचिकेची शुक्रवारी दखल घेतली. न्यायालयाने केंद्र व दिल्ली सरकारला नोटीस बजावून याचिकेवर उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, दिल्ली हिंसाचाराला जबाबदार लोकांवर ’यूएपीए’अन्वये कारवाईची मागणी दुसऱया याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

एस. एन. श्रीवास्तव यांच्याकडे पोलीस आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार

वरिष्ठ आयपीएस अधिकारी एस. एन. श्रीवास्तव यांच्याकडे दिल्लीच्या पोलीस आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. ईशान्य दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडे ही अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे. श्रीवास्तव यांना केंद्रीय राखीव पोलीस बलातून परत बोलावून त्यांची दिल्ली पोलिसांच्या विशेष आयुक्तपदी (कायदा आणि सुव्यवस्था) नियुक्ती करण्यात आली आहे. ते येत्या शनिवारी अमूल्य पटनायक यांच्याकडून पदभार स्वीकारणार आहेत.

हिंसाचाराचे राजकीय पडसाद

  • ईशान्य दिल्लीतील हिंसाचाराचे राजकीय क्षेत्रात पडसाद उमटले आहेत. शुक्रवारीही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी झाली. शहा यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी दिल्ली अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष डॉ. जफरूल इस्लाम यांनी केली.
  • भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना शुक्रवारी पत्रकारांनी दिल्लीतील हिंसाचाराबाबत प्रश्न केला. मात्र त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देणे टाळले. शिमला येथे ते पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारीत होते. या वेळी पत्रकारांनी दिल्ली हिंसाचाराचा प्रश्न उपस्थित करताच ते उत्तर न देताच तडक आपल्या गाडीकडे वळले.
आपली प्रतिक्रिया द्या