दिल्ली हिंसाचारात गोळीबार करणारा तरुण फरार?

813

सीएए, एनआरसीविरोधात दिल्लीत जनक्षोभाचा डोंब उसळला आहे. या हिंसाचारामुळे दिल्लीचं वातावरण अत्यंत तणावपूर्ण झालं आहे. गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या या हिंसाचारात पोलिसांवर 8 गोळ्या झाडणाऱ्या शाहरुख नावाच्या तरुणाला अटक झाल्याचं वृत्त प्रसारित झालं होतं. मात्र, आता हा तरुण फरार असल्याचं दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

रविवारपासून दिल्लीतील मौजपूर-गाझियाबाद परिसरात हिंसाचार उसळला आहे. या हिंसाचारादरम्यान एका तरुणाने पोलिसांवर आठ गोळ्या झाडल्या होत्या. पोलिसांनी त्याला रोखायचा प्रयत्न करूनही तो थांबला नव्हता. काही माध्यमांनी या तरुणाचे फोटोही प्रदर्शित केले होते. या फोटोनुसार, लाल रंगाचा टीशर्ट घातलेल्या एका तरुणाने पोलिसांसमोर गोळीबार केला होता. या व्यक्तीची पोलिसांनी ओळख पटवली असून त्याचे नाव शाहरूख असल्याचे समजले होते. त्याला अटक झाल्याचे वृत्तही प्रसारित झाले होते. मात्र, या तरुणाला अटक झाली नसून तो अद्याप फरार असल्याचं स्पष्टीकरण दिल्ली पोलिसांनी दिलं आहे. नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली पोलिसांनी या तरुणाला अटक झाल्याच्या वृत्ताचं खंडन केलं आहे. हा तरुण अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचं दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे.

शाहरुख असं नाव असलेला हा तरुण दिल्लीतील उस्मानपूर येथे अरविंद नगरमध्ये राहतो. पण, त्याच्या घराला कुलूप असून तो आणि त्याच्या घरातील इतर सदस्यही बेपत्ता आहेत. त्यांच्याविषयी कुणालाही काहीही माहीत नाही. शाहरुखच्या वडिलांचं नाव शावर पठाण असं असून त्यांचं कुटुंब 1985पासून तिथे राहतं. अंमली पदार्थ विक्रीच्या प्रकरणात पठाण यांना दोन वेळा अटक झाली असून गेल्या काही दिवसांपूर्वीच ते जेलमधून सुटून आले होते, अशी माहिती मिळत आहे.

दरम्यान, दिल्लीतील वातावरण अद्यापही तणावग्रस्त असून ‘हिंसाचारातील बळींची संख्या 38, तर जखमींची संख्या 364 वर गेली आहे. शहरातील तीन रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या जखमींपैकी अकरा जणांचा गुरुवारी मृत्यू झाला. अनेक जखमींची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे बळींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, परिसरात मोठय़ा प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा तैनात असून तणाव कायम आहे.

बुधवारी रात्रीपर्यंत बळींची संख्या 27 होती. गुरुवारी आणखी 11 जणांचा मृत्यू झाला. मागील 36 तासांत परिस्थितीत सुधारणा झाल्याचा दावा गृह मंत्रालयाने रात्री केला. गृह मंत्री अमित शहा यांनी दंगलग्रस्त भागातील परिस्थितीचा आढावा घेतला. पोलिसांनी चौकशीसाठी 514 संशयितांना ताब्यात घेतले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या