राजकीय नेत्यांची भडकावू भाषणे; दिल्लीकरांच्या याचिकांवर उच्च न्यायालयाने सुनावणी करावी!

294

दिल्लीतील दंगलीत हिंसाचाराचा फटका बसलेल्या नागरिकांच्या याचिकांवर तातडीने सुनावणी होणे गरजेचे आहे असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने 10 दिल्लीकरांच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने सुनावणी करावी असे निर्देश दिले. खंडपीठाने भडकावू भाषणांबाबत भाजप नेते प्रवेश गुप्ता, कपिल मिश्रा आणि केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी करणाऱया याचिका दिल्ली उच्च न्यायालयाकडे पाठवल्या. दरम्यान माजी नोकरशहा हर्ष मंदेर यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप केंद्र सरकारने लावला. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात केंद्राने शपथपत्र दाखल करावे असे निर्देश देत मंदेर यांची सुनावणी सर्वोच्च न्यायालयच करील असे स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली दंगलीतील हिंसाचारग्रस्त नागरिकांच्या याचिकांवर लवकर सुनावणी करावी आणि याच सुनावणीला नंतर येणाऱया याचिका जोडाव्यात असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना दिले. सरन्यायाधीश शरद बोबडे, न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली.

हिंसा व द्वेषामुळे भारतमातेचे नुकसान

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने बुधवारी राजधानी दिल्लीतील हिंसाचारग्रस्त भागांचा दौरा केला. हिंसा आणि द्वेषामुळे भारतमातेचे नुकसानच होणार आहे. दिल्लीतील हिंसाचारामुळे जगात हिंदुस्थानची प्रतिमा मलिन झाली आहे. बंधुभाव आणि एकता हीच आपली ताकद होती. याच शक्तीला इथे जाळण्यात आले आहे अशी प्रतिक्रिया राहुल गांधींनी दिली. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने ईशान्य दिल्लीतील बृजपुरी भागाला भेट दिली. तेथील हिंसाचारादरम्यान आंदोलकांनी पेटकून दिलेल्या शाळेची काँग्रेस नेत्यांनी पाहणी केली. त्यानंतर राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

आपली प्रतिक्रिया द्या