Delhi Violence – IB कर्मचारी अंकित शर्मांचा मृत्यू, कुटुंबीयांचा ताहिर हुसैन यांच्यावर आरोप

1053
ankit-sharma

दिल्ली हिंसाचारातील मृतांच्या आकड्यात आणखी वाढ झाली असून आता ही संख्या 37 पर्यंत पोहोचली आहे. यामध्ये intelligence bureau (गुप्तचर विभाग) मध्ये कार्यरत असलेल्या अंकित शर्मा यांचा देखील समावेश आहे. अंकित शर्मा यांच्या कुटुंबीयांनी आपल्या मुलाच्या मृत्यूला आम आदमी पक्षाचे (आप) चे आमदार ताहिर हुसैन जबाबदार असलाचे आरोप केले आहेत. वृत्तवाहिन्यांशी Delhi Violence संदर्भात बोलताना ताहिर यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

सोशल मीडियावर एक व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ईशान्य दिल्लीतील चांदबाग विभागातील हिंसाचार दिसतो आहे. काही समाजकंटक एका घराच्या गच्चीवरून दगड आणि पेट्रोल बॉम्ब खाली फेकताना दिसत आहेत. ज्या घरावरून हा प्रकार सुरू आहे ते घर ताहिर हुसैन असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडीओची आम्ही पुष्टी करत नाही. मात्र खुद्द ताहिर हुसैन यांनीच या व्हिडीओतील घर आपलेच असल्याचे वृत्तवाहिनी आजतकला सांगितले आहे. मात्र जेव्हा हा प्रकार सुरू होता तेव्हा आपण घरात नव्हतो, हे लोक कोण आहेत, ते आपल्या घराच्या छतावर कसे पोहोचले हे देखील आपल्याला माहीत नसल्याचे सांगत त्यांनी हात झाडले आहेत.

अंकित शर्मा यांच्या मृत्यूचे आपल्यालाही दु:ख आहे. मी त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे, असे ताहिर हुसैन यांनी सांगितले.

अंकितच्या कुटुंबीयांनी केले आरोप

घटनेच्या दिवशी अचानक आरडाओरड सुरू झाली. शेजारच्या घरातील मंडळींचा आवाज येत होता. त्यांच्या मदतीसाठी अंकित घराबाहेर धावला. अंकितच्या आईने त्यांना थांबवलं, मात्र अंकित यांनी ऐकले नाही. ते घरातून बाहेर पडले मात्र परतलेच नाहीत. त्यांचा मृतदेह जवळच्या नाल्यात सापडला. ताहिर हुसैन यांच्यामुळेच अंकित यांचा मृत्यू झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे.

न्यायमूर्तींची बदली

CAA समर्थक आणि विरोधकांमध्ये झालेली चिथावणीखोर विधाने, त्यानंतर झालेला हिंसाचार यामुळे दिल्लीत कायदा सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली. याच पार्श्वभूमीवर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीवेळी न्यायमूर्तींनी दिल्ली पोलिसांना चपराक लगावली. दिल्ली पोलिसांच्या भूमिकेवर ताशेरे ओढणाऱ्या न्या. एस मुरलीधर (justice muralidhar) यांची बुधवारी रात्रीच पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात बदली करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या