#DelhiViolence आयबी अधिकारी अंकित शर्मा हत्या प्रकरण – आरोपी सलमानला अटक

996

राजधानीत उसळलेल्या दंगलीमध्ये गुप्तचर संस्थेचा (आयबी) अधिकारी अंकित शर्मा यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने एका आरोपीला अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव सलमान उर्फ नन्हे असल्याचे दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले आहे. सध्या त्याची चौकशी सुरू आहे.

अटकेसंदर्भात माहिती देताना दिल्ली पोलिसांनी सांगितले की, आरोपीला पाच नावांनी ओळखले जात होते. सलमान उर्फ मोमिन उर्फ हसीन उर्फ मुल्ला उर्फ नन्हे अशी आरोपीची पाच नावे आहेत. आरोपीला सुंदर नगरी येथून अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. याआधी दिल्ली पोलिसांनी अंकित शर्मा यांच्या हत्येप्रकरणी आम आदमी पक्षाचे माजी नगरसेवक ताहिर हुसैन यालाही अटक केली आहे.

आमच्याकडे पुरावे आहेत – शहा
बुधवारी अमित शहा यांनी लोकसभेमध्ये दिल्ली हिंसाचारप्रकरणी चर्चेदरम्यान विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिले. यावेळी त्यांनी अंकित शर्मा हत्या प्रकरणी तपास करणाऱ्या एसआयटीला काही महत्त्वपूर्ण पुरावे हाती लागल्याचे म्हटले होते. अंकित शर्माच्या हत्येचे गूढ एका नागरिकाने पाठवलेल्या व्हिडीओद्वारे समोर येईल, असे शहा म्हणाले होते.

400 वेळा भोसकून हत्या
राजधानीत उसळलेल्या दंगलीमध्ये गुप्तचर संस्थेचा (आयबी) अधिकारी अंकित शर्मा यांची ईशान्य दिल्लीतील चाँद बाग येथे निर्घृण हत्या करण्यात आली. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार त्याच्या शरिरावर 400 पेक्षा जास्त वेळा भोसकण्यात आल्याचे उघड झाले. अंकित शर्मा यांच्या अपहरणाचा आणि हत्येचा (murder and abduction) आरोप असलेला आम आदमी पक्षाचा माजी नगरसेवक मोहम्मद ताहिर हुसैन (Mohammad Tahir Hussain) याला दिल्ली पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे.

कुटुंबियांनी केला होता आरोप
घटनेच्या दिवशी अचानक आरडाओरड सुरू झाली. शेजारच्या घरातील मंडळींचा आवाज येत होता. त्यांच्या मदतीसाठी अंकित घराबाहेर धावला. अंकितच्या आईने त्यांना थांबवले, मात्र अंकित यांनी ऐकले नाही. ते घरातून बाहेर पडले मात्र परतलेच नाहीत. त्यांचा मृतदेह जवळच्या नाल्यात सापडला. ताहिर हुसैन यांच्यामुळेच अंकित यांचा मृत्यू झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे. यानंतर एफआयआरमध्ये ताहिर हुसैन याचे नाव दाखल करण्यात आले आणि त्याला अटकही करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या