Delhi Violence – अजित डोवाल उतरले मैदानात, हिंसाचारग्रस्त भागाची केली पाहणी

7430

देशाची राजधानी दिल्ली गेल्या दोन दिवसांपासून आगीमध्ये जळत आहे. नागरिकता सुधारणा कायद्याविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाने सोमवारी हिंसक रुप घेतले. या हिंसाचारामध्ये आतापर्यंत 24 लोकांना आपला प्राण गमवाला लागला आहे. हिंसाचार रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांसह आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसजी) अजित डोवाल मैदानात उतरले आहेत.

अजित डोवाल यांनी बुधवारी ईशान्य दिल्लीतील हिंसाचारग्रस्त सीलमपूर आणि मौजपूर भागाचा दौरा केला. यावेळी अजित डोवाल यांनी सद्य परिस्थिती जाणून घेतली. तसेच येथील नागरिकांशीही त्यांनी संवाद साधला. हिंसाचार थोपवण्यास दिल्ली पोलीस सक्षम आहे असे विधान अजित डोवाल यांनी केले आहे.

डोवाल यांनी मंगळवारी रात्रीही जाफराबाद, सीलमपूर भागाचा दौरा केला होता. सीलमपूर भागात डीसीपी ऑफिसमध्ये भेट दिल्यानंतर डोवाल यांनी दंगलग्रस्त भागाचा दौरा केला. बुधवारीही त्यांनी जाफराबाद आणि मौजपूर भागाचा दौरा केला. डोवाल यांनी पायी चालत सद्य परिस्थिती जाणून घेतली आणि लोकांशी संवाद साधला. या दौऱ्यानंतर डोवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळाला सद्य परिस्थितीची माहिती देतील.

काय म्हणाले डोवाल?
राजधानी दिल्लीमध्ये कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही, असे एनएसजी अजित डोवाल म्हणाले आहेत. हिंसाचारग्रस्त भागामध्ये आवश्यक पोलीस आणि जवान तैनात करण्यात आले आहेत. तसेच परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी फ्री हँड देण्यात आले आहेत, असेही ते म्हणाले.

मृतांचा आकडा 24 वर
दरम्यान, दिल्लीमध्ये उफळलेल्या हिंसाचारामध्ये आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी पाच जणांचा मृत्यू झाला होत, तर मंगळवारी त्यामध्ये आणखी आठ जणांची भर पडून हा आकडा 12 वर पोहोचला होता. बुधवारी आणखी 8 जणांचा मृत्यू झाला आहे. गंभीर जखमींची संख्याही जास्त असल्याने मृतांचा आकडाही वाढत आहे. जखमींमध्ये सामान्य नागरिकांसह, पोलीस आणि आयपीएस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या