पेट्रोल बॉम्ब, गावठी कट्टे व दगडांचा खच; आप नेत्याच्या घरावर सापडला हत्यारांचा साठा

1306

दिल्लीमध्ये उसळलेल्या दंगलीमध्ये आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे मृतांचा आकडा वाढत असताना यावरून राजकारणही जोरात सुरू आहे. काँग्रेसने याचे खापर भाजपवर फोडले आहे, तर भाजपने यासाठी आप आणि काँग्रेसला जबाबदार धरले आहे. अशातच आपचे नगरसेवक ताहिर हुसैन यांच्या घराच्या छतावर पेट्रोल बॉम्ब, गावठी कट्टे, गलोल आणि मोठे दगड आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

नागरिकता सुधारणा कादद्याविरुद्ध सुरू असलेल्या आंदोलनात हिंसाचार उफळला होता. हिंसाचाराचा सर्वात मोठा फटका ईशान्य दिल्लीला बसला. या भागातील खजुरी येथे हिंसाचार भडकावण्यामागे आपचे नगरसेवक ताहिर हुसैन यांचा हात असल्याचा आरोप होत आहे. त्यांच्या घराच्या छतावर हत्यारांचा मोठा साठा आढळून आल्याने संशयाची सुई त्यांच्याकडे जात आहे. याआधी त्याच्या घरावरू दगड आणि पेट्रोल बॉम्ब आणि दगड फेकले जात असल्याचा व्हिडीओही समोर आला होता. तसेच आयबीचे अधिकारी अंकित शर्मा यांच्या हत्येसाठी त्यांच्या कुटुंबीयांनी ताहिर हुसैन यांच्या घरावर बसलेल्या जबाबदार धरले होते.

दरम्यान, आपचे नगरसेवक ताहिर यांनी सर्व आरोप फेटाळले असून आपण निर्दोष असल्याचे म्हटले आहे. मी हिंसाचार रोखण्याचा प्रयत्न केला. मी सर्व प्रकारच्या चौकशीसाठी तयार आहे. मी निर्दोष असून माझा याच्याशी काहीही संबंध नाही. माझ्या इमारतीचा दुरुपयोग झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच मी पोलिसांच्या उपस्थितीत 24 फेब्रुवारीला घरातून बाहेर पडल्याचेही हुसैनी यांनी म्हटले. अंकित शर्माच्या मृत्यूमुळे दु:ख झाले आहे, असेही ते म्हणाले.

घरावर हत्यारांचा साठा…
सलग चार दिवस दिल्लीमध्ये हिंसाचार उफळल्यानंतर गुरुवारी परिस्थिती नियंत्रणात आली. यानंतर माध्यमांचे प्रतिनिधी ताहिर हुसैन यांच्या घरावर गेले तेव्हा त्यांना तिथे हत्यारांचा साठा आढळला. यामध्ये पेट्रोल बॉम्ब, गावठी कट्टे, गलोल आणि मोठे दगड आढळून आले. तसेच विटा फोडल्यानंतर उरलेल्या दगड आणि विटांचा भुगाही आढळून आला. तसेच दगड मारण्यासाठी वापरलेली गलोलही आढळून आली. तसेच काही गावठी कट्टे आणि पोतेही आढळून आले.

आपचा बचाव
दरम्यान, ताहिर हुसैन यांच्याकडे संशयाची सुई जात असताना आम आदमी पक्ष त्यांच्या बचावासाठी पुढे आला आहे. आपने दिल्ली पोलिसांनाच धारेवर धरले. हुसैन यांनी काही प्रश्न उपस्थित केले असून त्यांच्या घरामध्ये जमाव घुसला होता, त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी पोलिसांकडे मदतही मागितली होती. त्यानंतर पोलीस तिथे 8 तासांनंतर पोहोचले आणि त्यांनी त्यांना बाहेर काढले. त्यानंतर दोन दिवसांपासून ते आपल्या घरीच नव्हते, असे आप नेते संजय सिंह यांनी म्हटले आहे. तसेच दिल्ली पोलिसांची निष्पक्ष चौकशीची मागणीही त्यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या