तुम्ही वाजपेयी यांचे ऐकले नाही, आमचे कसे ऐकाल – कपिल सिब्बल

1495

राजधानी नवी दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारानंतर काँग्रेसने केंद्र सरकारला राजधर्माचे पालन करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर पुन्हा एकदा राजकीय वादाला सुरुवात झाली आहे. राजधर्माच्या नावावर काँग्रेस जनतेला भडकवण्याचे काम करत असल्याचा आरोप केंद्रीय कायदेमंत्री रवीशंकर प्रसाद केला होता. त्यावर काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी पलटवार केला आहे. ”कायदेमंत्री म्हणतात, कृपया आम्हाला राजधर्म शिकवू नका, आम्ही तुम्हाला कसे शिकवू शकतो, मंत्री महोदय, तुम्ही गुजरातमध्ये वाजपेयी यांचा सल्ला ऐकला नाही, तर तुम्ही आमचे कसे ऐकाल. ऐकणे, समजणे आणि राजधर्माचे पालन करणे तुमच्या विचारसरणीतच नाही”,असे ट्विट कपिल सिब्बल यांनी केले आहे.

गुजरातमध्ये 2002 मध्ये दंगली उसळल्या असताना, तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना राजधर्माचे पालन करण्याचा सल्ला दिला होता. तो सल्ला तुम्ही ऐकला नाही, असे सिब्बल यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे. काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेत केंद्र सरकारने राजधर्माचे पालन करावे, अशी मागणी केली. दिल्लीतील हिंसाचाराला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जबाबदार असून त्यांच्या राजीनाम्याची मागणीही काँग्रेसने केली. त्यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेत काँग्रेसवर टीका केली. 2010 मध्ये काँग्रेसप्रणीत युपीए सरकारने एनपीआरचे नोटिफिकेशन जारी केले होते. तेच आम्ही केले तर काँग्रेसने जनतेला भडकवण्याचे काम सुरू केल्याचा आरोप भाजपने केला आहे.

दिल्लीतील हिंसाचारात आतापर्यंत 41 जणांचा मृत्यू झाला असून 200 पेक्षा जास्तजण जखमी झाले आहेत. वाहने, पेट्रोलपंप, घरे अशा सर्वजनिक आणि खासगी मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दिल्ली पोलिसांनी 123 एफआयआर दाखल केले आहेत. तर 600 पेक्षा जास्त जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे. त्यातच आता राजधर्माच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या