राजधानी दिल्लीची सुरक्षा आता रणरागिणींच्या हाती !

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

अन्य क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पराक्रम गाजवणाऱ्या महिला आता कमांडो बनून राजधानी नवी दिल्लीच्या रक्षणाची जबाबदारी सांभाळणार आहेत.स्वॅट महिला कमांडोचे पथक असणारे दिल्ली हे देशातील पहिले पोलीस दल ठरणार आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत शुक्रवारी स्वॅट महिला कमांडोंचा दिल्ली पोलीस दलात अधिकृत समावेश करण्यात आला. ईशान्य हिंदुस्थानातील ३६ महिलांचा या कमांडो युनिटमध्ये समावेश करण्यात आला आहे.

हिंदुस्थानी आणि परदेशी तज्ज्ञाच्या देखरेखीखाली या ३६ स्वॅट महिला कमांडोना अत्यंत कठोर, खडतर प्रशिक्षण देण्यात आले आहे. पुरुषांप्रमाणे महिलांचे अशा पद्धतीचे विशेष कमांडो युनिट उभारण्याची मूळ कल्पना दिल्लीचे पोलीस आयुक्त अमुल्य पटनायक यांची आहे. दिल्लीतील दहशतवादी करावाया रोखण्याची मुख्य जबाबदारी या पथकावर असेल. पुरुषांच्या तुलनेत या महिला सरस असल्याचे त्यांच्या प्रशिक्षणकर्त्यांनी सांगितल्याचे पटनायक म्हणाले.

पूर्वोत्तर हिंदुस्थानच्या रणरागिणींचे पथक
अनेक प्रगत पाश्चिमात्य देशांनी अजून महिलांचे स्वॅट कमांडो पथक उभारलेले नाही. त्यामुळे ही देशासाठी अभिमानास्पद बाब आहे. या ३६ महिला कमांडोंमध्ये आसाममधील १३, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि मणिपूरमधल्या प्रत्येकी पाच महिलांचा समावेश आहे. हिंदुस्थानप्रमाणेच इस्त्रायलमध्येही या महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. विनाशस्त्र कसे लढायचे ते सुद्धा या महिलांना शिकवण्यात आले आहे.

असे असेल महिला स्वॅट कमांडो पथक
> MP5 सबमशिन गन आणि ग्लॉक २१ पिस्तुलने या महिला कमांडो सुसज्ज
> मध्य आणि दक्षिण दिल्लीतील महत्वाच्या स्थळांवर या महिला कमांडोंची तैनाती
> नागरिकांना ओलीस ठेवण्यात आले असेल तर त्यांची कशी सुटका करायची
> इमारतींचे मजले कसे चढून जायचे त्याचे या महिला कमांडोंना प्रशिक्षण