डिलीव्हरी बॉयने स्वतःच कॅन्सल केली फूड ऑर्डर, ग्राहकाच्या घराबाहेर बसून मारला ताव

प्रातिनिधिक फोटो

ऑनलाईनच्या जगात अनेक कामं सोपी झाली आहेत. औषधापासून ते तयार अन्न मागवण्यापर्यंत बरीच कामं आपण ऑनलाईन तत्वावर करतो. पण, कधी कधी या पद्धतीचा वापर डोकेदुखी ठरू शकतो. याचाच प्रत्यय अमेरिकेतील एका महिलेला आला आहे.

अमेरिकेतील एका महिलेने जस्ट इट नावाच्या अॅप्लिकेशनवरून खाणं ऑर्डर केलं. ऑर्डर हॉटेलने स्वीकारली. पैसेही घेतले. त्यानंतर ही महिला डिलीव्हरी बॉयची वाट पाहू लागली. तो डीलिव्हरी बॉय तिची ऑर्डर घेऊन निघाला. बराच वेळ ही महिला त्याची आणि आपल्या ऑर्डरची वाट पाहत राहिली. खूप वेळ जेव्हा डिलीव्हरी बॉय आला नाही तेव्हा तिने तो कुठे पोहोचला हे पाहण्यासाठी अॅप्लिकेशन तपासलं.

तेव्हा तिला लक्षात आलं की तिने मागवलेली ऑर्डर घेऊन निघालेल्या डिलीव्हरी बॉयने परस्पर तिची ऑर्डर कॅन्सल करून टाकली होती. तिचं घर न सापडल्यामुळे त्याने तिच्याच परिसरात बसून तिच्या ऑर्डर केलेल्या खाण्यावर ताव मारला.

हे पाहून संतापलेल्या महिलेने अॅप्लिकेशनकडे तक्रार नोंदवली. या डिलीव्हरी बॉयचा ग्राहकाने ऑर्डर केलेलं खाणं खातानाचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. या प्रकरणी संबंधित अॅप्लिकेशनने त्वरित हालचाली सुरू केल्या असून दोषी आढळल्यास संबंधित डिलीव्हरी बॉयवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या